जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉन (Amazon) कंपनीच्या ॲपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीने करण्यात आली होती. मात्र, या मागणीच्या विरोधात ॲमेझॉन कंपनीने कोर्टाकडे धाव घेतली आहे. यामुळे अमेझॉन आणि मनसे यांच्यात संघर्षाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भुमिका घेत अॅमेझॉनविरुद्ध नव्या मोहिमेला सुरुवात केली आहे. नो मराठी, नो अॅमेझॉन (No Marathi, No Amazon) असे मनसेच्या या मोहिमेला नाव देण्यात आले आहे.

ॲमेझॉन ॲपद्वारे जगातील बहुतांश लोक वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करत असतात.यामध्ये मराठी भाषिक आणि महाराष्ट्र सुद्धा कमी नाही. सर्व ग्राहकांना सेवा देण्यासाठी ॲमेझॉनने त्यांचे ॲप तयार केलेले आहे. महाराष्ट्रातील मराठी जनता ॲमेझॉनकडून कोट्यावधी रुपयांची खरेदी करते. यामुळे ॲमेझॉनने त्यांच्या मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मनसेने वीस दिवसांपूर्वी केली होती. मात्र, अ‍ॅमेझॉनने सत्र न्यायालयात धाव घेत आपल्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषा समाविष्ट करु शकत नाही, अशी भूमिका मांडली. यानंतर मनसेने 'नो मराठी, नो ॲमेझॉन, बॅन अमेझॉन, महाराष्ट्रात फक्त मराठी, इथून पुढे तुमची डिलिव्हरी तुमची जबाबदारी' अशी मोहीम सुरु केली आहे. हे देखील वाचा- Maharashtra MLC Election 2020 Results: भाजपला पुन्हा सुतक, चंद्रकांत पाटील यांची खुमखुमी चांगलीच जिरली- शिवसेना

ट्विट-

दरम्यान मनसेच्या स्टुडंट विंगच्या अखिल चित्रे यांनी ट्विटरच्या माध्यमातून अ‍ॅमेझॉनला सवाल केला आहे. अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषा नसेल तर महाराष्ट्रात मराठी माणसांनी अ‍ॅमेझॉनचे अ‍ॅप का वापरावे? असे चित्रे यांनी म्हटले आहे. मनसेच्या या भुमिकेमुळे अॅमेझॉनच्या व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे आता न्यायालय काय निर्णय देणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.