Job Opportunities with Apple: फॉक्सकॉन बेंगळुरू येथे सुरु करणार नवीन iPhone चे उत्पादन; तब्बल 50,000 लोकांना मिळणार रोजगार, जाणून घ्या सविस्तर
Foxconn (Photo Credits: Twitter)

तैवानची बहुराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स कॉन्ट्रॅक्ट निर्माता कंपनी फॉक्सकॉन (Foxconn), पुढील वर्षी एप्रिलपासून बेंगळुरूमध्ये (Bengaluru) आयफोनचे (iPhone) उत्पादन सुरू करेल. यासाठी, कर्नाटक सरकार फॉक्सकॉनला जुलैपर्यंत जमीन देणार आहे, जेणेकरून कंपनी आयफोन बनवण्यासाठी कारखाना आणि इतर प्लांट्स इत्यादी उभारू शकेल. तब्बल 13,600 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला सरकारने गती देण्यास सुरुवात केली असल्याचे मोठे व मध्यम उद्योग मंत्री एम.बी.पाटील यांनी सांगितले. या प्रकल्पातून 50 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.

मंत्री म्हणाले की 300 एकर जमीन सरकार 1 जुलैपर्यंत फॉक्सकॉनला देईल. यासोबतच रस्ता, पाणी आणि वीजेची व्यवस्था करण्यासाठी सरकार कंपनीला मदत करणार आहे. यासोबतच राज्यातील लोकांना प्रशिक्षित करून कंपनीत काम करण्यासाठी तयार करता यावे यासाठी त्यांनी फॉक्सकॉनला कर्मचाऱ्यांच्या कौशल्य संचाची माहिती मागितल्याचेही एम.बी.पाटील यांनी सांगितले. फॉक्सकॉन ही करारावर इलेक्ट्रॉनिक उत्पादने तयार करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे.

तैवानच्या या कंपनीने कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाला (KIADB) सुमारे 90 कोटी रुपयांमध्ये 30% जमीन दिली आहे. फॉक्सकॉन हा प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण करेल आणि एकदा तो पूर्ण झाल्यावर कंपनी दरवर्षी 20 दशलक्षाहून अधिक आयफोन बनवेल. म्हणजेच कंपनी भारतात 20 दशलक्ष आयफोन तयार करणार आहे. दुसरीकडे, टाटाने भारतात विस्ट्रॉनच्या उत्पादन सुविधा घेतल्या आहेत आणि कंपनी देशात नवीन आयफोन मॉडेल तयार करत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, टाटा समूहाने बेंगळुरूजवळील नरसपुरा उत्पादन प्रकल्पात आयफोनचे उत्पादन सुरू केले आहे. अलीकडेच ऍपलचे सीईओ टिम कुक यांनी टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची भेट घेतली, त्यानंतर टाटा समूहाने विस्ट्रॉनचे अधिग्रहण केल्याची बातमी समोर आली. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या मतभेदांमुळे अॅपल हळूहळू चीनमधून भारतात आपला व्यवसाय हलवत आहे. फॉक्सकॉन लवकरच व्हिएतनाममध्ये 4,80,000 चौरस मीटर जमीन संपादित करणार आहे. (हेही वाचा: Goldman Sachs Layoff: गोल्डमॅन सॅच्स कंपनीत टाळेबंदी, 250 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर)

दरम्यान, नुकतेच अॅपलने भारतात आपले दोन अधिकृत स्टोअर उघडले आहेत. यापैकी एक जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉल वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे आहे आणि दुसरा सिलेक्ट सिटी वॉक मॉल, साकेत, दिल्ली येथे आहे. लोक या दोन स्टोअरमधून अॅपलची सर्व उत्पादने खरेदी केली जाऊ शकतात.