Google ने मागितली जाहीर माफी; भारतामधील सर्वात कुरूप भाषा म्हणून केला होता 'कन्नडा'चा उल्लेख
Representational Image (Photo Credits: Pixabay)

सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट क्षणार्धात व्हायरल होते व अवघ्या काही वेळात ती देशातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचते. काल असेच काहीचे गूगलच्या (Google) बाबतीत घडले. भारत हा बहुभाषिक देश आहे. इथे प्रत्येक भाषेबाबत त्या-त्या राज्यातील लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. मात्र काल आपण जर गुगलवर ‘भारतामधील सर्वात कुरूप भाषा’ (Ugliest Language in India) असे शोधले असते, तर गुगलने आपल्याला त्याचे उत्तर ‘कन्नड’ (Kannada) भाषा असे दिले असते. याच मुद्द्यावरून सोशल मिडियावर गुगलवर प्रचंड टीका झाली. त्यानंतर रात्री उशिरा गुगलने याबाबत जाहीर माफी मागितली आहे.

कन्नड ही दक्षिण भारतातील एक महत्वाची भाषा असून ती सुमारे 40 दशलक्ष लोकांद्वारे बोलली जाते. मुख्यत्वे कर्नाटक राज्यात ही भाषा बोलली जाते. मात्र कन्नडला भारतातील सर्वात कुरूप भाषा म्हणून संबोधल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. राज्य सरकारने सांगितले की, ते कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवतील. जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या संदर्भात गुगलला फटकारले, त्यानंतर गुगलने त्यांचे सर्च इंजिन अपडेट करत आपली चूक सुधारली. आता गुगलने माफी मागत म्हटले आहे की, 'गैरसमजामुळे कोणाच्याही भावना दुखावल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.’

गुगलने याबाबत ट्वीटरवर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे ज्यामध्ये म्हटले आहे, ‘सर्च नेहमीच परिपूर्ण नसतो. कधीकधी इंटरनेटवरील विशिष्ट प्रश्नांसाठी आश्चर्यकारक परिणाम दिसू शकतात. आम्हाला माहित आहे की हे परिपूर्ण नाही, परंतु जेव्हा आम्हाला एखाद्या समस्येबद्दल जागरूक केले जाते तेव्हा आम्ही त्वरित सुधारात्मक कारवाई करतो आणि आपले अल्गोरिदम सुधारण्यासाठी सतत कार्य करतो. साहजिकच यात गुगलचे स्वतःचे मत नाही आणि आम्ही या गैरसमजांबद्दल आणि कोणाच्याही भावना दुखावल्याबद्दल दिलगीर आहोत.' (हेही वाचा: Google Photos Unlimited Free Storage आज 1जूनपासून संपलं; पहा आता त्याला पर्यायी उत्तम Cloud Storage Plans कोणते?)

कर्नाटकचे कन्नड, संस्कृती व वनमंत्री अरविंद लिंबावली म्हणाले की, या प्रश्नाच्या उत्तराबाबत गुगलला कायदेशीर नोटीस पाठविली जाईल. नंतर, मंत्री यांनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली आणि गुगलला कन्नडिगा लोकांची माफी मागण्यास सांगितले. ते म्हणाले की, कन्नड भाषेचा स्वतःचा इतिहास आहे आणि ती सुमारे 2500 वर्षांपूर्वी अस्तित्वात आली आहे. ही भाषा शतकानुशतके कन्नडिगा लोकांचा अभिमान आहे. आता या विवादावर गुगलने माफी मागितली आहे.