BSNL OTT Service: बीएसएनएलने केली नवीन Cinemaplus नावाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा; ZEE5, SonyLIV, Lionsgate Play सोबत भागीदारी, जाणून प्लॅन्स व किंमत
TV | Representational Image (Photo Credits: Pixabay)

बीएसएनएलने (BSNL) ने आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन Cinemaplus नावाच्या ओटीटी व्यासपीठाची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने Lionsgate, Shemaroo,  Hungama, Epic-on अशा आघाडीच्या ओटीटी कंपन्यांशी भागीदारी केली आहे. याद्वारे देशभरात परवडणाऱ्या श्रेणीत ओटीटी कंटेंट प्रदान करण्याचे बीएसएनएलचे उद्दिष्ट आहे.

बीएसएनएल सिनेमाप्लस हे पूर्वी YuppTV Scope म्हणून ओळखले जात होते. हे मनोरंजनासाठी वन-स्टॉप डेस्टिनेशन म्हणून काम करत होते. परंतु YuppTV Scope फक्त एकच योजना ऑफर करत होते आणि जे प्रीमियम पॅक होते. त्याची किंमत 249 रुपये होती. पण आता बीएसएनएल सिनेमाप्लस एक एकीकृत इंटरफेस प्रदान करत आहे, ज्याद्वारे युजर्स ZEE5, SonyLIV, YuppTV, Disney+Hotstar, ShemarooMe, Hungama, Lionsgate Play, EPIC ON अशा विविध व्यासपीठांवरील कंटेंटचा विविध कस्टमायझेशनसह आनंद घेऊ शकतील.

बीएसएनएल युजर्सना तीन वेगवेगळे पॅक प्रदान करत आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या पॅकमध्ये वेगवेगळे ओटीटी प्लॅटफॉर्म्स समाविष्ट आहेत. तुम्ही तुम्हाला हवे असलेले पॅक निवडल्यास, पॅकमध्ये समाविष्ट असलेले सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स कनेक्शनशी जोडलेल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर सक्रिय केले जातील. याचे सदस्यता शुल्क मासिक शुल्कामध्ये समाविष्ट केले जाईल. (हेही वाचा: मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नसल्याच्या तक्रारी; आता सरकार तयार करणार कार्यप्रणाली)

बीएसएनएल सिनेमाप्लसमध्ये वापरकर्त्यांना स्टार्टर पॅक, फुल पॅक आणि प्रीमियम पॅक मिळतील. या पॅकची किंमत अनुक्रमे 49 रुपये, 199 रुपये आणि 249 रुपये आहे.

  • बीएसएनएल स्टार्टर पॅकमध्ये शेमारू, हंगामा, लायन्सगेट आणि एपिक यांचा आनंद घेऊ शकाल.
  • बीएसएनएल फुल पॅकमध्ये तुम्हाला ZEE5 Premium, SonyLIV Premium, YuppTV आणि Hotstar मिळेल.
  • बीएसएनएल प्रीमियम पॅकमध्ये तुम्हाला ZEE5 Premium, SonyLIV Premium, YuppTV, Shemaroo, Hungama, Lionsgate आणि Hotstar हे ओटीटी प्लॅटफॉर्म्स मिळतील.

सिनेमा प्लस वापरण्यासाठी तुमच्याकडे सक्रिय बीएसएनएल फायबर कनेक्शन असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला वर नमूद केलेल्या प्लॅनपैकी एक प्लॅन सक्रिय करावा लागेल. प्लॅन सक्रिय झाल्यानंतर, त्या प्लॅनमध्ये उपलब्ध सेवा मिळविण्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरसह लॉग इन करावे लागेल.