Tokyo Olympics 2020: पीव्ही सिंधू ऑलिम्पिक पदका नजिक, जपानच्या Akane Yamaguchi हिचा पराभव करुन सेमीफायनल फेरीत प्रवेश
पीव्ही सिंधू (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) खेळात भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूने (PV Sindhu) देशासाठी पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. जपानची आघाडीची शटलर अकाने यामागूची (Akane Yamaguchi) विरोधात सिंधूने 21-13, 22-20 असा विजय मिळवून सेमीफायनल सामन्यात धडक मारली आहे. सिंधूचे हे दुसरे ऑलिम्पिक (Olympic) असून तिने यापूर्वी 2016 रिओ ऑलिम्पिक खेळात ऐतिहासिक रौप्य पदकाची कमाई केली होती. यंदा भारताची एकमेव बॅडमिंटनपटू म्हणून टोकियो येथे महिला एकेरीत आव्हान देणारी सिंधू सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. आजच्या दिवशी ऑलिम्पिक पदक निश्चित करणारी सिंधू भारताची दुसरी खेळाडू ठरली आहे. यापूर्वी 23 वर्षीय बॉक्सर लवलिना बोर्गोहेनने सेमीफायनलमध्ये प्रवेश करत किमान कांस्य पदक निश्चित केले आहे. (Tokyo Olympics 2020: भारताचे दुसरे ऑलिम्पिक पदक निश्चित, Lovlina Borgohain हिची सेमीफायनलमध्ये धडक)

यंदाच्या टोकियो ऑलिम्पिक 2020 खेळात भारताने जबरदस्त सुरुवात केली. खेळाच्या पहिल्याच दिवशी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने रौप्य पदक जिंकून भारताच्या पदकांचे खाते उघडले. मात्र पुढील काही दिवशी नेमबाज, तिरंदाजांनी मात्र कामगिरीने निराशा केली. दुसरीकडे, आजच्या दिवशी आतापर्यंत लोव्हलिना बोर्गोहेनने महिलांच्या वेल्टरवेट (64-69 किलो) गटातील तिच्या उपांत्यपूर्व फेरीत नियन-चिन चेनला पराभूत केले. तसेच 25 मीटर पिस्तूल महिला पात्रता स्पर्धेत मनु भाकर आणि राही सरनोबत यांनी टीम इंडियासाठी निराशाजनक कामगिरी केली. भाकर आणि सरनोबतची जोडी पात्रता फेरी ठरण्यात अपयशी ठरली. भाकर केवळ 582 एकूण गुण मिळवू शकली, सरनोबतने भारतासाठी 573 गुण मिळवले. दुसरीकडे महिला तिरंदाजांच्या वैयक्तिक स्पर्धेत दीपिका कुमारी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या अ‍ॅन सॅनकडून पराभव पत्करावा लागला.

शिवाय, भारतीय महिला हॉकी संघाने आपल्या ऑलिम्पिक मोहिमेच्या सलग दोन पराभवानंतर पहिला विजय नोंदवला आणि आयर्लंडवर 1-0 अशी मात केली. तसेच, अविनाश साबळे पुरुषांच्या 300 मीटर स्टीपलचेजच्या फायनल फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. धावपटू दुती चंद देखील 100 मीटरच्या उपांत्य फेरीसाठी पात्रता फेरी पार करू शकली नाही आणि एकूण 45 व्या स्थानावर राहिली.