Manu Bhaker, Gukesh D awarded Khel Ratna award (फोटो सौजन्य - Twitter)

Khel Ratna Award 2025: भारतीय स्टार नेमबाज मनू भाकर (Manu Bhaker) आणि बुद्धिबळातील प्रतिभावान खेळाडू गुकेश डी (Gukesh D) यांना शुक्रवारी नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने (Major Dhyan Chand Khel Ratna Award) सन्मानित करण्यात आले. मनू आणि गुकेश यांच्यासोबत, भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा-अ‍ॅथलीट हाय जंपर प्रवीण कुमार यांनाही देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल या चारही खेळाडूंना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मनू भाकर हिने स्वातंत्र्यानंतर ऑलिंपिक खेळांच्या एकाच आवृत्तीत दोन पदके जिंकून भारताचा सन्मान वाढवला. तसेच गुकेश डी हा सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता बनला होता. हॉकी कर्णधार हरमनप्रीतने टोकियो ऑलिंपिक आणि पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताला दोन कांस्यपदके जिंकून दिली होती, तर प्रवीणने टोकियो गेम्स आणि पॅरिस गेम्समध्ये अनुक्रमे रौप्य आणि सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय, आज 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार सादरीकरणाचा व्हिडिओ येथे पहा -

दरम्यान, Chess.com इंडियाने गुकेश यांना राष्ट्रपतींकडून पुरस्कार मिळाल्याचा व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की, भारतीय बुद्धिबळासाठी एक ऐतिहासिक क्षण! माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल जीएम गुकेश यांचे अभिनंदन. तुमची मेहनत आणि आवड आपल्या सर्वांना पुढे प्रेरणा देत राहते.

खेलरत्न पुरस्कार जिंकणारे खेळाडू -

  • श्री गुकेश डी - बुद्धिबळ
  • श्री हरमनप्रीत सिंग - हॉकी
  • श्री प्रवीण कुमार - पॅरा-ॲथलेटिक्स
  • कु. मनु भाकर - नेमबाजी

गुकेश ठरला सर्वात तरुण विश्वविजेता -

गुकेशने 14 गेमच्या लढतीत चीनच्या डिंग लिरेनला हरवून सर्वात तरुण विश्वविजेता बनला होता. बुद्धिबळ विजेता बनणारा तो विश्वनाथन आनंदनंतर दुसरा भारतीय आहे.