Indian sprinters Hima Das and Muhammed Anas

भारताची स्टार धावपटू हिमा दास (Hima Das) हिने बुधवारी चेक प्रजासत्ताक येथे झालेल्या टाबोर अॅथलेटिक्स स्पर्धेत अजून एका सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. हिमाचे हे मागील 15 दिवसातले चौथे सुवर्ण पदक आहे. हिमाने महिलांच्या 200 मीटर शर्यतीत 23.25 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. दरम्यान, 200 मीटर शर्यतीत हिमाची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 23.10 सेकंद आहे. दुसरीकडे, भारताच्याच व्ही के विस्मया (V K Vismaya) हीने 23.43 सेकंदासह रौप्यपदक जिंकले. विस्मयाची ही या मोसमातील सर्वोत्तम वेळ ठरली.

हिमाला अद्याप विश्व चैम्पियनशिपच्या 200 आणि 400 मीटर शर्यतीत पात्रता मिळवता आली नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरण्याची वेळ 200 मीटरमध्ये 23.02 सेकंद आहे तर 400 मीटरसाठी 51.80 सेकंद आहे.

पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत मुहम्मद अनास (Muhammad Anas) याने 45.40 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. टॉम नोह निर्मलने 46.59 सेकंद वेळ नोंदवत रौप्य, तर के. एस. जीवन (K S Jeevan) ने 46.60 सेकंद वेळ नोंदवून ब्राँझपदकाची कमाई केली. 13 जुलैला क्लाडनो येथे, अनासने 400 मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रम रचत सुवर्णपदक मिळवले आणि विश्व चैम्पियनशिपची पात्रता मिळविण्याकरिता 45.21 सेकंदाचा वेळ नोंदवला.