Hero I League Suspended: कोरोनाने इंडियन फुटबॉल लीगवर लावला ब्रेकAIFF ने सहा आठवड्यांसाठी पुढे ढकलली फुटबॉल स्पर्धा
Picture used for representational purpose (Photo Credits: Getty Images)

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (All India Football Federation) सोमवारी येथे बायो-बबलमध्ये सुरक्षित वातावरणात सहभागी संघांमध्ये कोविड-19 ची प्रकरणे (COVID-19 Cases) वाढल्यामुळे किमान सहा आठवड्यांसाठी आय-लीग स्थगित केली आहे. ताज्या चाचणीनंतर COVID-19 पॉझिटिव्ह प्रकरणांची एकूण संख्या 45 वर गेली आहे, ज्यामुळे AIFF ने सहा आठवड्यांसाठी फुटबॉल (Football) स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. “आय-लीग किमान सहा आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे,” एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. आय-लीगचे अधिकारी पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परिस्थितीचा आढावा घेतील आणि भविष्यातील कृती ठरवतील. कोविड-19 ने बायो-बबलमध्ये प्रवेश केल्यावर बुधवारी आय-लीग एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात आठ खेळाडू आणि तीन अधिकारी व्हायरसने संक्रमित आढळले होते.

रिअल काश्मीर एफसीचे पाच खेळाडू आणि तीन संघ अधिकारी, मोहम्मडन स्पोर्टिंगचे प्रत्येकी एक खेळाडू, नवोदित श्रीनिदी डेक्कन एफसी आणि आयझॉल एफसीचे खेळाडू पॉझिटिव्ह आले आहेत. कोलकाता येथील मोहन बागान मैदान, कल्याणी येथील कल्याणी स्टेडियम आणि नैहाटी येथील नैहाटी स्टेडियम या तीन ठिकाणी यंदाच्या आय-लीगमध्ये तेरा संघ स्पर्धा करणार आहेत. एआयएफएफ स्पोर्ट्स मेडिकल कमिटीचे सदस्य डॉ हर्ष महाजन यांनी क्लबला माहिती दिली की देशभरात संसर्गाची वाढती प्रकरणे, पश्चिम बंगाल सरकारने लादलेले नवीन कोविड निर्बंध आणि खेळाडू व अधिकाऱ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेशी तडजोड न करण्याच्या AIFF च्या दृष्टीकोनातून आय-लीग 2021-22 किमान 6 आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे.

दरम्यान 5 जानेवारी रोजी सर्व संघांची पुन्हा कोविड-19 चाचणी केली जाईल, त्यामुळे बायो बबलचा प्रोटोकॉल 7 जानेवारीपर्यंत सुरू राहील. यानंतर निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर टीम आपापल्या घरी जाऊ शकते. हॉटेलमध्ये पॉझिटिव्ह आलेले खेळाडू आणि अधिकारी आयसोलेशनमध्ये राहतील आणि कोलकाता येथे निर्धारित आरोग्य मानकांनुसार त्यांच्यावर उपचार केले जातील. नंतर निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्यांनाही जाण्याची परवानगी दिली जाईल.