भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू केदार जाधव (Cricketer Kedar Jadhav) याच्या वडिलांचा शोध लागला आहे. पुणे शहरातील कोथरुड (Kothrud) परिसरातून सोमवारी (27 मार्च) बेपत्ता झालेले केदार जाधव याचे वडील मुंडवा (Mundhwa) परिसरात सापडले. महादेव जाधव बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी शहरातील विविध विभागांमध्ये शोधमोहीम राबवली होती. इतकेच नव्हे तर कोथरुड, एरंडवणे भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासण्यात आले होते. कसून शोध घेतल्यानंतर अखेर सोमवारी रात्री उशीरा मुंढवा परिसरात सापडले.
महादेव जाधव बेपत्ता झाल्यानंतर जाधव कुटुंबाकडून अलंकार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद घेतली होती आणि तपास सुरु केला होता. दरम्यान, केदार जाधव याचे कुटुंबीय कोथरुड परिसरात निवासाला आहेत. पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, प्राप्त तक्रारीनुसार महादेव जाधव हे कोथरुड परिसरातून सोमवारी (27 मार्च) सकाळी अचानक रिक्षाने बाहेर गेले. मात्र, बराच काळ उलटला तरी ते परत आलेच नाहीत. त्यामुळे वाट पाहून थकलेल्या कुटुंबीयांनी थेट अलंकार पोलीस ठाणे गाठले आणि ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. (हेही वाचा, Pune: क्रिकेटर Kedar Jadhav चे वडील पुण्यातून बेपत्ता; पोलिसात तक्रार दाखल, शोध सुरु)
महादेव हे केदार जाधव याचे वडील असल्याने प्रकरण हायप्रोफाईल बनले होते. परिणामी पोलिसांनी प्रकरणाची तातडीने दखल घेत हा तपास विशेष पथकाकडे सोपवला. पोलिसांनी कसून शोध घेतला. कोथरूड, एरंडवणे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊनही शोध घेतला. अनेक ठिकाणी असलेले रिक्षा थांबे, रिक्षाचालक आणि इतरांकडे चौकशी केल्यानंतर अखेर रात्री साडेआकरा वाजण्याच्या सुमारास मुंडवा परिसरात महादेव जाधव आढलून आल्याची माहिती अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.