भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup) 2021 स्पर्धेला आता फक्त तीन महिने शिल्लक राहिले आहेत. टी-20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाने (Team India) श्रीलंकेविरुद्ध शेवटची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका ही आयसीसी स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची शेवटची टी-20 मालिका होती. तसेच भारतीय खेळाडू आता सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये भाग घेतील आणि त्यानंतर लगेचच टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. या आयसीसी मेगा स्पर्धेसाठी भारतीय संघात (Indian Team) कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने (Zaheer Khan) श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी -20 मालिकेनंतर 15 सदस्यीय संघ निवडला आहे, जो टी -20 विश्वचषकात भाग घेऊ शकतो. (IND vs SL T20I 2021: मुंबई इंडियन्सच्या ‘या’ दोन खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी रेस, टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आहे महत्वाची जागा)

झहीरने यामध्ये लंकन संघाविरुद्ध भारताने नेतृत्व केलेल्या शिखर धवन आणि कुलदीप यादवचा समावेश केला नाही. श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेत शिखर धवन विशेष काही कामगिरी करू शकला नाही. झहीर क्रिकबझवर म्हणाला, “मला केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्यासह डावाची सुरुवात करायला आवडे. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव त्यानंतर येतील. मला माहित आहे की विराटने म्हटले की तो डावाची सुरुवात करू शकतो, पण तरीही मी असे म्हणेन की जेव्हा हार्दिक गोलंदाजीसाठी उपलब्ध नसेल तेव्हा विराटने डाव उघडला पाहिजे.” झहीर खानच्या मते, सूर्यकुमार यादवची टी -20 विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये निवड झाली पाहिजे. झहीरच्या मते युजवेंद्र चहल संघाचा भाग असावा आणि वरुण चक्रवर्ती किंवा वॉशिंग्टन सुंदरला त्याचा साथी फिरकीपटू म्हणून संघात समाविष्ट करावे. याशिवाय रवींद्र जडेजा फिरकी अष्टपैलू म्हणून संघाचा भाग असेल. तसेच झहीरने राहुल चाहर फिरकी बॅकअप म्हणून सुचवले आहे.

टी 20 विश्वचषकासाठी झहीर खानचा 15 सदस्यीय संघ: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, दीपक चाहर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, राहुल चाहर, टी नटराजन/भुवनेश्वर कुमार, वॉशिंग्टन सुंदर/वरुण चक्रवर्ती.