Dream Team of ICC World Cup: रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांचा समावेश, केन विल्यमसन कर्णधार
रोहित शर्मा, आणि जसप्रीत बुमराह (Photo Credits-Getty Images)

इंग्लंडमध्ये आयोजित आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकच्या ऐतिहासिक फायनलमध्ये यजमान इंग्लंड (England) चा विजय झाला. यंदाचे विश्वचषक फायनल टाय झाली. दोन्ही संघानी निर्धारित ओव्हरमध्ये 242 धावा केल्या. त्यानंतर झालेली सुपर ओव्हर देखील टाय झाली. अखेर इंग्लंडने न्यूझीलंड (New Zealand) पेक्षा जास्त बाऊंड्री मारण्याच्या आधारावर इंग्लंडला विजयी टीम घोषित करण्यात आले. फायनलच्या काही तासानंतर आयसीसी कडून 'टीम ऑफ द टुर्नामेंट' जाहीर करण्यात आली आहे. 46 दिवस चाललेल्या या विश्वचषकात अनेक दिग्गज खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे. अशाच 12 खेळाडूंची दखल घेत आयसीसीने आपल्या 'टीम ऑफ द टुर्नामेंट' मध्ये त्यांना स्थान दिले आहे. (विराट कोहली फक्त टेस्ट टीमचा कॅप्टन; रोहित शर्मा कडे जाणार वनडे आणि टी-20 कर्णधारपदाची धुरा?)

या 12 खेळाडूंमध्ये सर्वाधिक 4 खेळाडू इंग्लंडचे आहेत. तर न्यूझीलंडच्या 3 खेळांडूचा समावेश करण्यात आला आहे. भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघांचे प्रत्येकी 2 आणि बांगलादेश (Bangladesh) च्या 1 खेळाडूचा समावेश आहे. या संघाचे केन विलियमसन (Kane Williamson) याच्याकडे या टीमचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. आयसीसीने आपल्या 'टीम ऑफ द टुर्नामेंट' मध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला वगळता सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांचा समावेश आहे. रोहितने यंदाच्या विश्वचषकमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान पटकावला आहे. बुमराहने 9 मॅचमध्ये टीम इंडियासाठी एकूण 18 विकेट घेतल्या. यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम बुमराहने केला.

ही आहे आयसीसीने जाहीर केलेली टीम

रोहित शर्मा, जेसन रॉय, केन विलियमसन (कॅप्टन), जो रुट, शाकिबल हसन, बेन स्टोक्स, एलेक्स कॅरी, जोफ्रा आर्चर, मिचेल स्टार्क, लॉकी फर्ग्युसन, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.