ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या महिला टी-20 विश्वचषकातील (Women's T20 World Cup) अंतिम चार संघांमधील सेमीफायनल सामने निश्चित झाले आहे. 5 मार्च रोजी भारत-इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघ फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी आमने-सामने येतील. हे सामने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) खेळले जातील. पहिला उपांत्य सामना भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात, तर दुसर्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात होईल. हे दोन्ही सेमीफायनल सामना एकाच दिवशी खेळले जाणार आहे. जर गुरुवारी पावसामुळे हे सामने रद्द झाले, तर भारतीय संघ थेट अंतिम फेरीत पोहचेल कारण त्यांनी गटातील सर्व सामने जिंकले आणि गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. दुसरीकडे, जर यजमान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) रद्द झाला तर कांगारू टीमचा जेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंग होईल आणि दक्षिण आफ्रिकेचा भारतासोबत फायनल सामना खेळेल. (Women's T20 World Cup 2020: भारत-इंग्लंड महिला संघात रंगणार टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलचा थरार, ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका आमने-सामने)
गुरुवारी सिडनी येथे मुसळधार पाऊस पडण्याची मोठी शक्यता आहे. हवामान संकेतस्थळांनुसार 5 मार्चला सिडनी येथे 100 टक्के पाऊस पडेल. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेसाठी ही बातमी चांगली असली तरी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का सिद्ध होऊ शकते. भारताला याचा फायदा होण्याचे कारण म्हणजे ग्रुप स्टेजमधील त्यांची कामगिरी. भारताने गटातील चारही सामने जिंकले.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकानेही गटात एकही सामना गमावला नाही. पहिल्या लीग सामन्यात आफ्रिकेने इंग्लंडला 6 विकेट्स, थायलंडला 113 धावांनी आणि त्यानंतर पाकिस्तानला 17 धावांनी पराभूत केले. त्यांचा वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा लीग सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.आफ्रिकेने त्यांच्या गटात अव्वल स्थान मिळवले आणि आता त्याचा फायदा उपांत्य सामन्यात मिळू शकतो.