Will Kieron Pollard play IPL? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतलेला किरॉन पोलार्ड सर्व फॉरमॅटमधून बाहेर? आयपीएल खेळणार की नाही?
किरोन पोलार्ड (Photo Credit: PTI)

Kieron Pollard Retires: वेस्ट इंडिजचा (West Indies) व्हाईट बॉल कर्णधार किरॉन पोलार्ड  (Kieron Pollard) याने आयपीएल (IPL) 2022 सुरु असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तत्काळ निवृत्ती घेतली आहे. सध्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत असलेल्या पोलार्डने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून धक्कादायक घोषणा केली. 34 वर्षीय पोलार्डने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडेमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर पुढच्या वर्षी पोलार्डने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. 224 मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पोलार्डच्या नावावर 196 डावांमध्ये 4,275 आंतरराष्ट्रीय धावांची नोंद आहेत. तर सर्व फॉरमॅटमध्ये 106.15 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत असलेल्या पोलार्डने तीन शतके आणि 19 अर्धशतके झळकावली आहेत. यानंतर आता चाहत्यांच्या मनात, पोलार्ड आयपीएल (IPL) खेळणार की नाही? असा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल. (Kieron Pollard Retirement: मुंबई इंडियन्सचा ‘तात्या’ किरॉन पोलार्ड याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, 15 वर्षात खेळले 224 सामने, एका ओव्हरमध्ये खेचले सहा ‘सिक्सर’)

पोलार्डने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “सावध विचारविनिमय केल्यानंतर मी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.” 2013 मध्ये दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचे नेतृत्व केल्यानंतर पोलार्डला 2019 मध्ये विंडीजचा व्हाईट-बॉल कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. एकूणच, पोलार्डने 24 एकदिवसीय आणि 39 टी-20 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचे नेतृत्व केले आहे. दरम्यान पोलार्डच्या आश्चर्यकारक घोषणेच्या पार्श्वभूमीवर लक्षात घेणे गरजेचे आहे की पोलार्ड आयपीएल आणि जगभरातील इतर T20 लीगमध्ये खेळत राहील.

आयपीएल 2022 मधील निराशाजनक कामगिरीनंतर पोलार्डचा निर्णय समोर आला आहे. या घोषणेनंतर आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डासमोर नवा कर्णधार निवडण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलार्डने निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पोलार्ड जगातील एकमेव खेळाडू आहे ज्याने आपल्या देशासाठी 100 हून अधिक एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळले परंतु लक्षणीय आहे की या कालावधीत त्याला एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने आपल्या 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत वेस्ट इंडिजसाठी एकही कसोटी सामना खेळला नाही आणि कॅरेबियन संघासाठी 123 वनडे व 101 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.