कुमार कार्तिकेय सिंह (Photo Credit: Twitter)

आयपीएल (IPL) 2022 मधील पहिल्या विजयासाठी आतुर असलेल्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघात स्पर्धेच्या मध्यात बदल झाला आहे. दुखापतग्रस्त मोहम्मद अर्शद खानच्या जागी कुमार कार्तिकेय सिंह (Kumar Kartikey Singh) याचा संघात समावेश करण्यात आला आहे. कुमार कार्तिकेय सिंह देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून (Madhya Pradesh) खेळतो आणि मुंबईने त्याला 20 लाख रुपयांत संघात समाविष्ट केले आहे. कुमार कार्तिकेयने आतापर्यंत नऊ प्रथम श्रेणी सामने, 19 लिस्ट ए सामने आणि आठ टी-20 सामने खेळले असून, यामध्ये अनुक्रमे 35, 18 आणि 9 बळी घेतले आहेत. सिंह सपोर्ट टीमचा भाग म्हणून यापूर्वी मुंबई इंडियन्स फ्रँचायझी सोबत होता. अर्शदला दुखापत झाली असून तो उर्वरित आयपीएल (IPL) मधून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत आता 2022 च्या हंगामासाठी संघात कुमारला करारबद्ध केले आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर 30 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. (Arjun Tendulkar IPL Debut: मुंबई इंडियन्सने पुन्हा दिला इशारा, सलग 8 पराभवानंतर आता अर्जुन तेंडुलकरची होणार एन्ट्री? Watch Video)

कुमार कार्तिकेय सिंहच्या कारकिर्दीवर नजर टाकायचे झाले तर तो एक संथ डावखुरा गोलंदाज आहे आणि 2018 मध्ये पदार्पण केल्यापासून त्याने खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व केले आहे. कुमार कार्तिकेय नेट्समध्ये प्रभावी ठरला आहे आणि त्याच्या गोलंदाजी कौशल्‍य सुधारण्‍याच्‍या आणि सुरेख करण्‍याच्‍या शिकण्‍याच्‍या मार्गामुळे त्‍याला मुख्‍य संघात जाण्‍याची संधी मिळाली आहे.

दरम्यान, आतापर्यंत आयपीएल 2022 प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला नाही, परंतु मुंबई इंडियन्स या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ असल्याचे ठरले आहे. या मोसमात रोहित शर्माच्या संघाने 8 सामने खेळले असून प्रत्येक वेळी संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईने अखेरचा सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळला. या सामन्यात 24 धावांनी पराभव पत्करावा लागल्याने संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. यांनतर आता पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स 30 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या हंगामातील पहिला सामना जिंकण्याच्या उद्देशाने पुन्हा मैदानात उतरेल. मुंबई संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी आगामी सामन्यांमध्ये सन्मानासाठी लढत इतर संघांचे समीकरण बिघडवण्यासाठी प्रयत्नशील असेल.