Jarvo 69 Invades Pitch at The Oval: कोण आहे ‘जार्वो 69’, ज्याने इंग्लंड विरुद्ध भारत टेस्ट सिरीज दरम्यान केले परेशान
YouTuber डॅनियल जार्विस उर्फ 'जार्वो 69' (Photo Credit: Twitter/AwaaraHoon)

Jarvo 69 Invades Pitch at The Oval: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) संघातील चौथा कसोटी सामना सध्या लंडनच्या ओव्हल (The Oval) मैदानात सुरु आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या गोलंदाजी दरम्यान डॅनियल जार्विस (Daniel Jarvis) उर्फ ‘जार्वो 69’ पुन्हा एकदा मैदानात पळत आला. ही घटना भारताचा गोलंदाज उमेश यादव गोलंदाजी करताना घडली. भारतीय खेळाडूंच्या दिशेने खेळपट्टीवर YouTuber डॅनियल जार्विस उर्फ ‘जार्वो 69’ मैदानात घुसला आणि त्याने जॉनी बेयरस्टोला टक्कर दिली. त्यानंतर त्याला सुरक्षारक्षकांनी खेचून मैदानाबाहेर काढले. यादरम्यान खेळ काही मिनिटे थांबवण्यात आला. ‘जार्वो 69’ चा व्हीडीओ ट्वीटरवर मोठ्याप्रमाणावर ट्रेंड होत असून यूजर्सने त्याला खसवले आहे. ‘जार्वो 69’ चे हे नाट्य इंग्लंड विरुद्ध भारत चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात घडले. यापूर्वी लॉर्ड्स कसोटी  (Lords Test) सामन्यादरम्यान भारताच्या क्षेत्ररक्षणादरम्यान जार्वो मैदानात पोहचला होता. यानंतर भारतीय संघ हेडिंग्ले येथे फलंदाजी करत असताना आणि रोहित शर्मा बाद झाल्यावर जार्विस पॅड आणि हेल्मेट घालून मैदानात उतरला. पण ‘जार्वो 69’ म्हणून प्रसिद्ध हा व्यक्ती आहे तरी कोण? (IND vs ENG: वारंवार मैदानात घुसणाऱ्या टीम इंडियाचा इंग्लिश चाहता Jarvo 69 विरोधात यॉर्कशायर काउंटीने केली मोठी कारवाई)

जार्वो स्वतःला भारतीय संघाचा इंग्लिश चाहता म्हणून घेतो. जार्वोला त्याच्या खऱ्या नावाने 'डॅनियल जार्विस' क्वचितच कोणाला परिचित असेल. दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय क्षेत्ररक्षक म्हणून लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर प्रवेश केल्यानंतर तो प्रकाशझोतात आला. त्याच्या भारतीय जर्सीचे नाव 'जार्वो 69' होते. एका गोऱ्या क्रिकेट चाहत्याने केवळ खेळपट्टीवर चालणे नव्हे, तर क्षेत्ररक्षक असल्याचे भासवणे हे एक धक्कादायक दृश्य होते. ओळख पटल्यानंतर, जार्विसला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताबडतोब मैदानातून बाहेर काढले. दरम्यान, यापूर्वी देखील जार्विसने बऱ्याच क्रीडा स्पर्धा सुरु असताना अडथळा आणला आहे. 2015 डायव्हिंग वर्ल्ड सीरिज दरम्यान, त्याने लंडनमधील एक्वाटिक्स सेंटरमधील सुरक्षा मोडली. त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात तो पोलवर जाण्यापूर्वी त्याचे कपडे काढताना दिसत होता. या घटनेचा व्हिडिओ मुळात त्याच्या 'ट्रोलस्टेशन' नावाच्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट करण्यात आला होता. जार्विस त्यावेळी 26 वर्षांचा होता. इतकंच नाही तर या ब्रिटिश व्यक्तीने यापूर्वी फुटबॉल स्टेडियममध्ये घुसखोरी केली होती.

दुसरीकडे, लीड्सच्या हेलिंग्टन कसोटी सामन्यादरम्यान देखील जार्वोने सुरक्षारक्षनाक्का चकमा देत मैदानावर धाव घेतली होती. त्याच्या या कृतीवर कारवाई करत यॉर्कशायर काउंटीने त्याच्यावर कठोर कारवाई केली आणि त्याला मैदानात येण्यास आजीवन बंदी घातली. याशिवाय त्याला मोठा दंडही ठोठावण्यात आला. मात्र, त्याने यातून कोणताही धडा न घेता सलग तिसऱ्यांदा मैदान गाठले.