Sushant Singh Rajput Dies: जेव्हा सुशांत सिंह राजपूतच्या फलंदाजीने प्रभावित झाला होता सचिन तेंडुलकर, पाहा काय म्हणाला होता
सचिन तेंडुलकर, सुशांत सिंह राजपूत (Photo Credit: Getty/Twitter)

बॉलिवूडचा युवा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) रविवारी मुंबईत (Mumbai) आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. टिव्ही मालिकेपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेल्या सुशांतने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) आयुष्यावर आधारित चित्रपटात 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' मध्ये सुशांतने धोनीची भूमिका निभावली होती. माजी भारतीय कर्णधाराची भूमिका साकारून सुशांतने प्रेक्षकांना वेड लावलं. सुशांतने माजी भारतीय यष्टिरक्षक फलंदाज आणि राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष किरण मोरे यांच्याकडून फलंदाजीचे धडे शिकले आणि धोनीची भूमिका बजावली. चित्रपट निर्मात्यांकडे सुशांतच्या प्रशिक्षणाची जबाबदारी मोरे यांना सोपविण्यात आली होती जेणेकरुन त्याला धोनीची खेळण्याची शैली अधिक चांगल्या प्रकारे समजेल. धोनीची भूमिका साकारण्यासाठी सुशांतने प्रचंड मेहनत घेतली होती आणि एकदा सराव सराव करत असताना सुशांतला सचिन तेंडुलकरने बघितलं आणि त्याची फलंदाजी बघून मास्टर-ब्लास्टरही थक्क झाला होता. (Sushant Singh Rajput Suicide: जेव्हा सुशांत सिंह राजपूतचा 'हेलिकॉप्टर शॉट' पाहून धोनीलाही धक्का बसला, किरण मोरे यांनी दिले होते प्रशिक्षण)

जुन्या आठवणींना मोरे यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना उजाळा दिला आणि म्हणाले,“मला आठवतंय, प्रशिक्षणाच्या काही आठवड्यानंतर सुशांत धोनीच्या फेमस हेलिकॉप्टर शॉटचा सराव करत होता. त्यावेळी सचिन तेंडुलकर वांद्रेतील बीकेसी मैदानावर आला होता. सचिन गॅलरीतून सुशांतची फलंदाजी बघत होता. सुशांतचा सराव संपल्यानंतर थोड्या वेळाने मी सचिनला भेटलो. त्यावेळी सचिन मला म्हणाला, 'तो मुलगा कोण आहे? तो खूप चांगली फलंदाजी करतोय.' त्यावर मी सांगितलं की, तो अभिनेता सुशांत आहे. तो धोनीवर येणाऱ्या चित्रपटासाठी तयारी करत आहे. हे ऐकून सचिन अवाक् झाला. त्यानंतर तो मला म्हणाला, जर त्याची इच्छा असेल, तर तो प्रोफेशनल क्रिकेट खेळू शकतो.' तो चांगला खेळाडू असल्याचं सचिनला दिसलं होतं.”

सुशांतने धोनीची मुमेंट खूप चांगल्या प्रकारे जाणून घेतली आणि माजी कर्णधारांची खरी प्रतिमा पडद्यावर टिपण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. अभिनेता म्हणून त्याच्या कारकिर्दीतील सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. सुशांतने किरण मोरेबरोबर तासनतास सराव केला आणि धोनीची शैली रुपेरी पडद्यावर शानदार रूपात सादर केली.