Team India: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया बनत आहे नवीन 'Chokers'? पाहा आकडेवारी
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) टीम इंडियाला (Team India) 8 विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. दुसर्‍या डावात 170 धावांवर बाद झाल्यानंतर भारतीय संघाने (Indian Team) विजयासाठी किवी संघासमोर 139 धावांचे माफक लक्ष्य ठेवले होते, जे त्यांनी दोन विकेट गमावून सहज गाठले. या पराभवामुळे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे ‘विराटसेने’चे स्वप्न अपूर्ण राहिले. बुधवारी न्यूझीलंडकडून डब्ल्यूटीसीच्या अंतिम (WTC Final) सामन्यात पराभूत झाल्यानंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (International Cricket Council) गेल्या सात वर्षात अनेकवेळा उपांत्य-अंतिम आणि अंतिम अडथळ्यांना पार न करू शकणारी टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नवीन 'चोकर्स' बनली आहे. (IND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंड ठरला ऐतिहासिक विजेता, क्रिकेट विश्वातून कौतुकांचा वर्षाव, पाहा प्रतिक्रिया)

टीम इंडियासाठी गेल्या दशकात चांगली सुरुवात झाली होती आणि त्यांनी 2011 50-ओव्हर वर्ल्ड कप व पाठोपाठ 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद पटकावले होते. पण 2014 पासून भारताने अनेकदा अंतिम अडचण पार करण्यात अपयशी ठरला आहे. श्रीलंकेकडून 2014 टी-20 फायनल, 2015 विश्वचषकयामध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात, वेस्ट इंडिजविरुद्ध 2016 टी-20 वर्ल्ड कप सेमीफायनल, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल आणि 2019 वर्ल्ड कप उपांत्य फेरीत त्यांना किवी संघाकडून पराभव पत्करावा लागला. बुधवारी सहाव्या राखीव दिवशी डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याने ड्रॉच्या दिशेने वाटचाल केली होते पण अखेरीस भारताने सामना आणि विजेतेपद गमावले.

2019 वर्ल्ड कप किंवा WTC, टीम इंडियाने बहुतेक प्रसंगी लीग सामन्यात सर्व संघांपैकी सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. न्यूझीलंडपेक्षा विजयाच्या चांगल्या टक्केवारीसह लीगच्या टप्प्यात भारतीय संघ अपवादात्मक ठरला होता. भारताचा विजयी टक्केवारी 70.6 होती, तर दुसरीकडे न्यूझीलंडची विजयी टक्केवारी 63.6 इतकी होती. महत्त्वाचे म्हणजे, भारताने देशाबाहेर तीन मालिकेपैकी दोन मालिका जिंकल्या तर न्यूझीलंडने परदेशात खेळलेल्या दोन मालिकांपैकी एकही मालिकेत विजय मिळवला नाही.