TATA WPL 2024 Schedule: महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम 22 फेब्रुवारीपासून होऊ शकतो सुरू, बीसीसीआयने टाइम फ्रेम केली जाहीर
WPL Auction (FIle Photo)

TATA WPL 2024: महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या (WPL) सत्रातील यशस्वी कामगिरीनंतर आता चाहते दुसऱ्या सत्राची आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिल्या सत्राचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (MI vs DL) यांच्यात झाला. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून पहिले महिला प्रीमियर लीगच्या जेतेपद पटकावले. आता या लीगच्या दुसऱ्या सत्राची तयारीही सुरू झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रासाठी कालमर्यादा काढली आहे. ही लीग पुढील वर्षी 22 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान खेळवली जाण्याची शक्यता आहे.

मात्र, याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या लीगचे संपूर्ण वेळापत्रक जानेवारीमध्ये जाहीर होऊ शकते. यावेळी महिला प्रीमियर लीगचे सामने एका ऐवजी वेगवेगळ्या शहरात खेळवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या मोसमात सर्व सामने मुंबईतच झाले. (हे देखील वाचा: WPL 2024 All 5 Teams Squads: आगामी डब्लूपीएलचा लिलाव संपन्न, 30 खेळाडूंचे नशीब चमकले; पाहा पाच संघांची अंतिम यादी)

यावेळी, महिला प्रीमियर लीगचे सामने मुंबई तसेच बेंगळुरूमध्ये खेळवले जाऊ शकतात. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. गुजरात जायंट्स संघाची मार्गदर्शक मिताली राज म्हणाली की तिला ही लीग एकाच ठिकाणी केंद्रित करण्याऐवजी अनेक ठिकाणी पाहायला आवडेल. गेल्या वेळी महिला प्रीमियर लीगचे सामने ४ मार्चपासून सुरू झाले होते. त्याच वेळी, या लीगचा अंतिम सामना 26 मार्च रोजी खेळला गेला. मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगचे पहिले विजेतेपद पटकावले.

महिला प्रीमियर लीग मिनी लिलाव

महिला प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाच्या कालमर्यादेशी संबंधित ही माहिती मुंबईत झालेल्या मिनी लिलावापूर्वी फ्रँचायझींसोबत शेअर करण्यात आली आहे. आज झालेल्या या लिलावात काही निवडक खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैशांचा पाऊस पडला. काशवी गौतम आणि अॅनाबेल सदरलँड यांना प्रत्येकी २ कोटी रुपयात विकत घेण्यात आले.