T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकात आजपासून Super-12 ची लढाई, टीम इंडिया समोर आणखी 2 तगड्या संघाचे आव्हान
आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 2020 ट्रॉफी  (Photo Credits: Getty Images)

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup) 2021 चा सुपर-12 सामना शनिवारपासून सुरू होणार आहे. या टप्प्यातील पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यात आज दुपारी अबु धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळला जाईल. टी-20 विश्वचषक 2021 मध्ये टीम इंडियाचा (Team India) पहिला सामना पाकिस्तानशी (Pakistan) होईल. हा हाय-व्होल्टेज सामना 24 ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. सर्व क्रिकेट चाहते या खेळाची आतुरतेने वाट पाहत आहेत. राउंड-1 मध्ये अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. यानंतर बांगलादेश, श्रीलंका, स्कॉटलंड आणि नामिबिया यांनी सुपर-12 मध्ये प्रवेश केला. तसेच टी-20 विश्वचषक स्पर्धेचे यजमान ओमान, पापुआ न्यू गिनी, आयर्लंड आणि नेदरलँड्स संघाचा प्रवास इथेच संपुष्टात आला. (T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियन दिग्गज क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी, ‘या’ 4 संघात रंगणार सेमीफायनलचा ‘महासंग्राम’)

टीम इंडियाला पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तानसह ग्रुप-2 मध्ये ठेवण्यात आले असून आता या गटात नामिबिया आणि स्कॉटलंड संघ देखील सामील झाले आहे. आता आयसीसीचे जेतेपद जिंकण्यासाठी या सर्व संघांमध्ये चुरशीची लढत रंगणार आहे. भारत आणि स्कॉटलंडचा सामना 5 नोव्हेंबरला होणार आहे, तर भारत आणि नामिबिया यांच्यात 8 नोव्हेंबरला सामना होणार आहे. दुसरीकडे, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, श्रीलंका आणि नामिबिया आता अ गटात आहेत. शनिवारी होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकच्या सुपर-12 आणि ग्रुप-1 च्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडसमोर गतविजेता वेस्ट इंडिजचे कडवे आव्हान असणार आहे. वेस्ट इंडिज संघात अनेक स्फोटक टी-20 फलंदाज आहेत परंतु पाकिस्तान आणि अफगाणिस्तानविरुद्ध सराव सामन्यांमध्ये त्यांच्या निराशाजनक कामगिरीमुळे पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. दरम्यान, ICC T20 विश्वचषक 2021 स्पर्धेतील टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान - 24 ऑक्टोबर, 7:30 PM, दुबई

भारत विरुद्ध न्यूझीलंड - 31 ऑक्टोबर, 7:30 PM, दुबई

भारत विरुद्ध अफगाणिस्तान - 3 नोव्हेंबर, 7:30 PM, अबू धाबी

भारत विरुद्ध स्कॉटलंड - 5 नोव्हेंबर, संध्याकाळी 7:30 PM, दुबई

भारत विरुद्ध नामिबिया - 8 नोव्हेंबर, संध्याकाळी 7:30 PM, दुबई

सुपर-12 गट

गट-1: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका, नामिबिया.

गट-2: भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड, बांगलादेश.