T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियन दिग्गज क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी, ‘या’ 4 संघात रंगणार सेमीफायनलचा ‘महासंग्राम’
ब्रॅड हॉग (Photo Credit: Instagram)

ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगने (Brad Hogg) 17 ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) 2021 च्या उपांत्य फेरीतील संघाची निवड जाहीर केली आहे. स्पर्धेचा सुपर 12 टप्पा 23 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. उल्लेखनीय म्हणेज हॉगने पहिल्या चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी दावेदार म्हणून ऑस्ट्रेलियाचे नाव घेतले नाही. “मला वाटते की जे संघ उपांत्य फेरीत जाणार आहेत ते इंग्लंड (England) आणि वेस्ट इंडीज (West Indies) गट 1 मधून आहेत आणि गट 2 मधून मला वाटते की ते पाकिस्तान (Pakistan) आणि भारत (Pakistan) असतील,” हॉग यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर दीप दासगुप्ता यांच्याशी संवाद साधताना सांगितले. विशेष म्हणजे, 2016 मध्ये झालेल्या स्पर्धेच्या शेवटच्या आवृत्तीत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज अंतिम फेरीत पोहोचले होते. दुसरीकडे,2007 मध्ये उद्घाटन आवृत्तीत जेतेपद आणि 2014 फायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभूत झालेल्या भारताला हॉगने यंदाच्या जेतेपदाचा दावेदार म्हणून उल्लेख केला. (T20 World Cup 2021: श्रीलंकेची वर्ल्ड कप सुपर-12 मध्ये शानदार एन्ट्री, ग्रुप 1 मध्ये ‘या’ संघाशी भिडणार)

दरम्यान, हॉगने पाकिस्तानची सलामीच्या सामन्याची शक्यता देखील उघड केली आणि पूर्वावलोकन केले. पाकिस्तान न्यूझीलंड, भारत, अफगाणिस्तान आणि त्यांच्या गटातील दोन पात्रता संघांसोबत आहेत. हॉग म्हणाले की जर पाकिस्तान भारताविरुद्ध सामना हरला, तर त्यांची पात्र होण्याची शक्यता नाही. भारत आणि पाकिस्तान 24 ऑक्टोबरपासून दुबईत आपल्या मोहिमेला सुरुवात करतील, तर दोन्ही संघ पुढील सामना अनुक्रमे 26 आणि 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरोधात खेळतील. भारतानंतर न्यूझीलंडविरुद्ध देखील पराभूत झाल्यास पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. सर्व क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत आणि पाकिस्तान दोघेही इतिहासात दुसऱ्यांदा ही स्पर्धा खिशात घालण्याच्या प्रयत्नात आहेत.

आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 मधील सुपर 12 फेरी 23 ऑक्टोबरपासून सुरू होईल. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका अ गटात आहेत. तर भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे ब गटात आहेत. तसेच सुरू असलेल्या पहिल्या फेरीनंतर प्रत्येकी 2 संघ प्रत्येकी अ गट आणि ब गटात सुपर 12 फेरीत सामील होतील. प्रत्येक संघ सुपर-12 टप्प्यात 5 सामने खेळेल. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ उपांत्य फेरी गाठतील. अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.