Bhuvneshwar Kumar (Photo Credits: IANS)

कोरोनाच्या संकटामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League 2020) तेरावा हंगाम यूएईमध्ये खेळवण्यात येत आहे. आयपीएलच्या गेल्या अनेक हंगामात डेव्हिड वार्नर याच्या नेतृत्वाखाली हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) संघाने बऱ्याच संघाला धूळ चारली आहे. मात्र, या हंगामात हैदराबादचा संघ 5 सामने खेळूनदेखील गुणतालिकेत तळाशी आहे. यातच रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध पराभवाचा सामना करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. दुखापतीमुळे हैदराबाद संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज विरोधातील सामन्यात त्याला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला 19 षटक पूर्ण टाकता आले नाही.

दुखपतीमुळे भुवनेश्वर कुमार पुढील कोणत्याच सामन्यात खेळणार नसून त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने सुत्राच्या हवाल्याने दिली आहे. तसेच हैदरबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वार्नर दुखापतीबद्दल माहिती देताना म्हणाला होता की, “भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे पुढील काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. तसेच संघाचा प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर गेल्यामुळे याचा फटका नक्कीच बसणार आहे. परंतु, संघ यामधून नक्कीच सावरेल, असेही वार्नर म्हणाला होता. हे देखील वाचा- IPL 2020 Points Table Updated: आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्स अव्वल स्थानी; CSK विरुद्ध पराभवानंतर KXIP तळाशी

आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळाडूंच्या दुखापतीचे सत्र सुरुच आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचे फिरकी गोलंदाज अमित मिश्राला कोलकाता नाईट राईडर्स विरुद्ध सामन्यात बोटाला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. दिल्लीच्या संघासाठी हा मोठा झटका असून संघाला अमित मिश्राची कमतरता जाणवेल की नाही? हे येत्या पुढील काही सामन्यानंतरच स्पष्ट होईल. तसेच त्याच्या जागी कोणत्या खेळाडू संधी देण्यात आली आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.