जो रूट (Photo Credit: PTI)

SL vs ENG 1st Test 2021: इंग्लंडचा (England) कसोटी संघाचा कर्णधार जो रूटने (Joe Root) श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) गाले (Galle) येथील पहिल्या कसोटीत शानदार द्विशतक झळकावले. रुटचे हे कसोटी करिअरमधील चौथे तर श्रीलंकाविरुद्ध दुसरे दुहेरी शतक ठरले. यासह तो आयसीसी कसोटी स्पर्धेदरम्यान दुहेरी शतक ठोकणारा तिसरा कर्णधारही ठरला. इतकंच नाही तर इंग्लंड कर्णधार रूटने टेस्ट क्रिकेटमध्ये देशासाठी एकापेक्षा जास्त द्विशतक ठोकणारा इंग्लिश कर्णधार म्हणून नवा विक्रम नोंदवला आहे. खेळाच्या दीर्घ स्वरुपात नेतृत्वाची भूमिका घेतल्यानंतरचे रूटचे हे दुसरे दुहेरी शतक होते. कर्णधार म्हणून रुटने पहिले द्विशतक न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टनमध्ये 2019 मधील कसोटी सामन्यात ठोकले होते. रूटने 331 चेंडूंत 228 धावा केल्या ज्या श्रीलंकाविरुद्ध कोणत्याही इंग्लिश क्रिकेटपटूने केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. त्याच्या खेळीच्या वेळी रूटनेही 8000 धावा पूर्ण केल्या आणि ही कामगिरी करणारा तो इंग्लंडचा सातवा फलंदाज ठरला. (IND vs ENG T20I 2021: इंग्लंडविरूद्ध टी-20 मालिकेसाठी 'हे' 5 खेळाडू टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्याचे आहेत दावेदार)

इंग्लंडच्या एकूण आठ कर्णधारांनी आतापर्यंत कसोटीत दुहेरी शतकं झळकावली आहे. पीटर मे, ग्रॅहॅम गूच, अ‍ॅलिस्टर कुक, विल हॅमंड, डेविड गॉवर, टेड डेकस्टर, लिओनार्ड हटन या इंग्लंड खेळाडूंनी कर्णधार म्हणून द्विशतकी धावसंख्या पार केली आहे. रूटने 291 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने दुहेरी धावसंख्या गाठली. यादरम्यान त्याने पहिल्या डावात इंग्लंडची धावसंख्या 400 पार नेली. इंग्लंडने शानदार गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा पहिला डाव 135 धावांवर संपुष्टात आणला होता. त्याने जॉनी बेअरस्टो आणि डॅनियल लॉरेन्स यांच्यासह दोन द्विशतकी भागीदारी केले ज्यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात 421 धावांचा डोंगर उभारला आणि त्यांनी यजमान संघावर 286 धावांची आघाडी घेतली. श्रीलंका देखील नंबर 4 कसोटी संघाला लढा देण्यात अपयशी ठरली.

दरम्यान, आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत दुहेरी शतक झळकावणारा रूट हा जगातील तिसरा कर्णधार ठरला. यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडच्या केन विल्यमसन यांनी हे कामगिरी बजावली आहे. विल्यमसनने चॅम्पियनशिपमध्ये दोन तर विराटने एक कसोटी द्विशतक ठोकले आहे. दुसरीकडे, सध्याच्या टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक दुहेरी शतक ठोकणारा कर्णधार विराट एकमेव खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत एकूण 7 दुहेरी शतके ठोकली आहेत.आश्चर्यकारक म्हणजे त्याने कर्णधार बनल्यानंतरच सर्व दुहेरी शतके ठोकली आहेत. माजी दिग्गज सचिन तेंडुलकरने 6 दुहेरी शतके ठोकली आहेत.