भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना ओव्हल (The Oval) मैदानात खेळला जात आहे. या मालिकेदरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) अनेक निर्णय धक्कादायक ठरले. सलग चार कसोटी सामन्यांमध्ये नंबर वन फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला कोहलीच्या निर्णयामुळे बाहेर बसून राहावे लागले आहे. त्यानंतर ओव्हलवर सुरु असलेल्या चौथ्या सामन्यात कर्णधाराने अष्टपैलू रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) आघाडीचा फलंदाज आणि संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) पुढे पाचव्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवले. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी विराटच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ओव्हल सामन्यात नाणेफेकपासून भारतीय कर्णधार कोहलीच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (IND vs ENG: इंग्लंडमध्ये Ajinkya Rahane चा फ्लॉप शो सुरूच, ‘या’ 2 फलंदाजांसाठी खुले होऊ शकते कसोटी संघाचे दार)
अनेक दिग्गजांचा असा विश्वास होता की, तीन सामन्यांमध्ये दुर्लक्षित करण्यात आलेल्या अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळायला हवी होती. कोहलीच्या निर्णयाची चर्चा अजून संपली नव्हती की त्याने आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला. अष्टपैलू जडेजाला रहाणेच्या आधी दोन्ही डावांमध्ये फलंदाजीला उतरवले. रहाणेच्या आधी जडेजाला पाठवण्याबाबत बोलताना गावस्कर भाष्य करताना म्हणाले, “हा निर्णय माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे. मला वाटले की रहाणे पहिल्या डावात काही कारणास्तव वेळेवर तयार होऊ शकत नाही, म्हणून जडेजा त्याच्यापुढे फलंदाजीला उतरला. तो शौचालयाच्या ब्रेकसाठी गेला असेल पण तो एक सुविचारित निर्णय नव्हता. मला समजत नाही की रहाणे तुझा उपकर्णधार आहे, तो आघाडीचा फलंदाज आहे मग त्याच्या आधी जडेजाला कसे पाठवले जात आहे. या संघातील प्रत्येकासाठी एक नियम नाही, प्रत्येकासाठी एक वेगळा नियम आहे.”
लिटिल मास्टर पुढे म्हणाले, “आत्मविश्वास दाखवावा लागतो. तो धावा काढत नाही पण त्याला सांगितले पाहिजे की 5 व्या क्रमांकावर तू आमचा फलंदाज आहेस '6 वर नाही आणि तेच घडले. आश्चर्य नाही की तो 0 धावांवर बाद झाला.” रहाणे ओव्हल मैदानावर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या डावात 14 धावाच करू शकला तर दुसऱ्या डावात तो भोपळा न फोडता माघारी परतला.