सरफराज खान 605 धावा करून  झाला आऊट; व्हीव्हीएस लक्ष्मण, एव्हर्टन वीक्स यांना प्रथम श्रेणीच्या 'या' एलिट यादीमध्ये टाकले मागे
सरफराज खान (Photo Credits: Twitter)

मुंबईचा (Mumbai) 22 वर्षीय फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) याने आपल्या फलंदाजीद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) सरफराज मुंबईसाठी आपल्या जीवनाच्या सर्वोत्तम फॉर्मचा आनंद लुटत आहे आणि या युवा फलंदाजाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरीची नोंद केली. शेवटच्या दोन डावांमध्ये नाबाद 301 आणि 226  धावा करणारा 22 वर्षीय फलंदाजाने पुन्हा एकदा उपयुक्त कामगिरी बजावली आणि सौराष्ट्राविरुद्ध रणजी ट्रॉफी सामन्यात 78 धावा केल्या. कमलेश मकवानाकडून बाद होण्यापूर्वी सरफराजने प्रथम श्रेणीत एकूण 605 धावा केल्या, जे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजांनी केलेल्या सातव्या सर्वाधिक धावा आहेत. हिमाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी त्याने 226 धावा केल्या. पावसामुळे तो सामना पुढे खेळता आला नाही आणि मुंबई संघ आता सौराष्ट्र (Saurashtra) विरुद्ध खेळत आहे. यापूर्वी झालेल्या रणजी सामन्यात सरफराजने 3 शतकी केली आहेत. (Ranji Trophy 2019-20: भारतीय फलंदाज वसीम जाफर ने रचला इतिहास, रणजी ट्रॉफीमध्ये 12000 धावा करणारा बनला पहिला खेळाडू)

सरफराजने सौराष्ट्राविरुद्ध 78 धावांची खेळी केली. त्याच्या 126 चेंडूंच्या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्यानंतर कमलेश मकवानाने त्याला बोल्ड केले पॅव्हिलिअनला पाठविले. यासह तो 3 डावांनंतर बाद झाला. अशा प्रकारे सरफराज 605 धावा करून बाद झाला आणि रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदविले. बाद न होता सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता 7 व्या स्थानावर पोहचला आहे. या प्रकरणात त्याने माजी भारतीय संघाचा दिग्गज व्हीव्हीएल लक्ष्मण आणि एव्हर्टन वीक्स यांना मागे ठेवले. माजी भारतीय फलंदाज केसी इब्राहिम यांनी बाद न होता सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला आहे. त्यांनी बाद न होता 1847/48 मध्ये सलग 709 धावा केल्या. 73 वर्षांनंतरही अद्याप हा विक्रम अबाधित आहे. 1990 मध्ये इंग्लंडच्या ग्रीम हिक यांनी 645 धावा केल्या आहेत.

हंगामाच्या सुरुवातीला सरफराज प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक करणारा मुंबईचा सातवा फलंदाज ठरला. सरफराजने आजवरच्या कारकीर्दीत एकूण 15 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 65.38 च्या सरासरीने एकूण 1177 धावा केल्या आहेत.