सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी क्रिकेट विश्वातली जय विरू जोडी. दोघांनी शालेय क्रिकेट अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. १९८८ साली शालेय क्रिकेट स्पर्धेत आझाद मैदानात ६६४ धावांची भागीदारी रचल्यापासून सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोघे चर्चेत आले. दोघांनी नंतर भारतासाठी प्रतिनिधित्व केले परंतु एका बाजूला सचिनला क्रिकेट विश्वाने देव म्हणून संबोधले तर विनोदला म्हणावी तशी छाप पडता आली नाही. त्यांच्या नात्यात दुरावा नंतर अलीकडेच सचिन आणि विनोद कांबळी या जोडी मध्ये पुन्हा मैत्रीचे नाते सुरु झाले असून आता विनोद कांबळीने सचिनच्या महात्वाकांशी योजनेत आपले योगदान द्यायचे ठरवले आहे.
सचिन इंग्लिश मिडलसेक्स काउंटी क्लबसोबत मिळून नवी क्रिकेट अॅकेडमी स्थापन करणार आहे ज्याचे नाव तेंडुलकर-मिडलसेक्स ग्लोबल अॅकेडमी असेल. या अॅकेडमी अंतर्गत सचिन आणि त्याची टीम मुंबईतल्या वेग वेगळ्या मैदानात जाऊन प्रतिभावान युवा खेळाडूंना निवडणार असून त्यांना प्रशिक्षण देणार आहेत. सचिनच्या या टीम मध्ये विनोद कांबळीचे पण नाव जोडले गेले आहे. सचिन स्वत: या लहान मुलांना प्रशिक्षण देणार आहे.
सचिनने मुंबई मिररशी बोलताना या बातमीला दुजोरा दिला. तो म्हणाला, “शाळेत असल्यापासून मी आणि विनोद एकत्र क्रिकेट खेळलो आहोत. नुकतेच आम्ही भेटलो त्यावेळी मी विनोदला या प्रोजेक्टबद्दल सांगितले त्यावेळी त्याने लगेच होकार दिला”. विनोद कांबळीने सुद्धा या प्रोजेक्टसाठी आपण किती उत्सुक आहोत हे बोलून दाखवले. तसेच या निम्मिताने जुन्या आठवणी ताज्या होतील असे ही म्हणाला.
असं असेल सचिनचं क्रिकेट कॅम्प:
१ ते ४ नोव्हेंबर दरम्यान नेरुळच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये आणि त्यानंतर ६ ते ९ नोव्हेंबर दरम्यान वांद्रे एमआयजी क्लब येथे या कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर १२ ते १५ नोव्हेंबर आणि १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान पुणे येथे कॅम्प होईल. या कॅम्प मधून युवा प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेतला जाणार असून त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिले जाणार आहे. ७ ते १७ आणि १३ ते १८ वयोगटातील क्रिकेटपटू या कॅम्पमध्ये सहभागी होऊ शकतात.