भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) युवा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) म्हणाला की महान फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) त्याला आपला नैसर्गिक खेळ खेळायचा आणि मैदानावर शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. टीम इंडियाच्या अन्य क्रिकेटर्सप्रमाणेच युवा फलंदाज पृथ्वीनेही सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधला. त्याची आयपीएल टीम दिल्ली कॅपिटल्सने लाईव्ह सत्र आयोजित केले होते, ज्यात शॉने सचिनला त्याचा आदर्श असल्याचे म्हटले. तसेच तो नेहमीच सचिनसारखा खेळण्याचा प्रयत्न करतो असेही तो म्हणाला. शॉ म्हणाला की सचिन तेंडुलकरच्या सल्ल्यामुळे त्याने आज टीम इंडियात स्थान मिळवले आहे. पृथ्वीने नुकताच भारताकडून आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये डेब्यू केले. 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या पृथ्वीने सांगितले की तो सचिनला देव मानतो. सचिनप्रमाणेच त्यालाही खेळायचे आहे आणि तो त्याच्या शैलीत खेळायचा प्रयत्न करतो. (On This Day: 'डेजर्ट स्टॉर्म' जेव्हा सचिन तेंडुलकर ने शारजाहमध्ये शेन वॉर्न ची केली धुलाई, 22 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन संघात निर्माण केली दहशत)
सचिनच्या सल्ल्यानुसार पृथ्वीवर फलंदाजीचे तंत्र निर्माण करण्यास कशी मदत केली या संदर्भात पृथ्वीने खुलासा केला. “त्याचा (तेंडुलकर) माझ्यावर खूप प्रभाव आहे. मी आठ वर्षांचा होतो तेव्हा मी प्रथम त्याला भेटलो. तो मला नेहमी माझा नैसर्गिक खेळ आणि परिस्थितीनुसार खेळण्यास सांगतो. मैदानाबाहेरही त्याने मला शांत राहण्यास सांगितले,” शॉने त्याच्या आयपीएल टीम दिल्ली कॅपिटलसबरोबर इन्स्टाग्राम लाइव्ह चॅट दरम्यान सांगितले. “लोकं माझी त्याच्याशी जेव्हा तुलना करतात तेव्हा दबाव असतो. पण मी एक आव्हान म्हणून घेतो. मी त्याच्यासारखा खेळण्याचा प्रयत्न करतो. तो क्रिकेटचा देव आहे,” तो म्हणाला.
पृथ्वी म्हणाला सचिनने त्याला बॅटवरची त्याची पकड न बदलण्याचा सल्ला दिला होता. “मी तळागाळातला खेळाडू आहे आणि सचिन सरांनी मला माझी पकड बदलू नका असे सांगितले होते. मी तरुण होतो आणि प्रशिक्षकांच्या सल्ल्यानुसार मी माझी पकड बदलायचो. पण सचिन सरांनी मला सांगितल्यानंतर मी माझी पकड बदलली नाही, ”शॉ म्हणाला. पृथ्वीने आपल्या छोट्या कारकीर्दीत खूप प्रभाव पाडला आहे. शॉने चार टेस्ट सामन्यांमध्ये 55.83 च्या सरासरीने 335 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यात त्याने 3 सामन्यात 28 च्या सरासरीने 84 धावा केल्या आहेत.