Yuzvendra Chahal याला रोहित शर्माने दिल्यालग्नाच्या हटके शुभेच्छा, म्हणाला- ‘तू तुझ्या गुगली तिला न टाकता राखून ठेव’
युजवेंद्र चहल आणि रोहित शर्मा (Photo Credits: Twitter)

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) 22 डिसेंबर रोजी धनश्री वर्मासोबत (Dhanashree Verma) विवाहबंधनात अडकला. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला. चहलने स्वतः इंस्टाग्रामद्वारे माहिती जाहीर केली. त्यानंतर चाहते आणि खेळाडूंनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. या दरम्यान, भारताचा सलामीवीर व मर्यादित ओव्हर संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) हटके अंदाजात चहलला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. यावर्षी आयपीएलपूर्वी ऑगस्ट महिन्यात चहल आणि धनश्रीचा रोका सोहळा पार पडला होता. अन्य खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडप्रमाणे धनश्रीदेखील चहलबरोबर आयपीएल 2020 दरम्यान यूएईमध्ये उपस्थित होती आणि सामन्यांदरम्यान चहलची टीम रॉयल चॅलेन्जर्स बेंगलोरला सपोर्ट करताना दिसत होती. रोहितने ट्विटरवरून चहलचे ट्वीट रिट्विट करत नवीन जोडप्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि एक सल्लाही दिला. (Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Wedding: स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल अडकला विवाहबंधनात; धनश्री वर्माशी बांधली लग्नगाठ See Photo)

रोहितने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘अभिनंदन भावा, दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा. तू तुझ्या गुगली तिला न टाकता विरोधी संघांसाठी राखून ठेव.’ सोशल मीडियावर चहलने अनेकदा रोहितची खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळाले आहे, पण यंदा 'हिटमॅन'ने फिरकीपटूला मजेदार शुभेच्छा दिल्या. दरम्यान, चहलने आपल्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे शेअर केली. “22.12.20 आम्ही “वन्स अपॉन अ टाइम ”पासून सुरुवात केली आणि आम्हाला आमचा हॅपिली एव्हर अटर अफेयर्स”, मिळाला कारण अखेरीस, #DhanaSaidYuz अनंत काळासाठी!” असे म्हणत लग्नाच्या कार्यक्रमात फोटो शेअर करताना चहलने लिहिले.

दरम्यान, रोहित सध्या ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहे. रोहित आपल्या दुखापतीतून सावरत ऑस्ट्रेलियाला उशिराने दाखल झाला ज्यामुळे त्याला 14 दिवस सक्तीने क्वारंटाइन राहावे लागणार असून तो 30 डिसेंबर रोजी अन्य संघ खेळाडूंसोबत सामील होईल. रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यासाठी भारतीय संघात खेळताना दिसू शकतो. दुसरीकडे, चहल वनडे आणि टी-20 मालिकेनंतर भारतात परतला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिकेदरम्यान चहल गोलंदाजीत खूपच महागडा सिद्ध झाला होता.