Rohit Sharma & Yashasvi Jaiswal (Photo Credit - X)

मुंबई: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका (IND vs BAN Test Series 2024) 19 सप्टेंबरपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. तर आज बांगलादेशने भारताविरुद्ध मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. दरम्यान या मालिकेत भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांच्या एकाच विक्रमावर नजर असेल. या दोन्ही खेळाडूंना यंदाचा बादशाह बनायला आवडेल. (हे देखील वाचा: IND vs BAN Test Series 2024: बांगलादेशविरुद्ध गेम चेंजर ठरतील टीम इंडियाचे 'हे' तीन गोलंदाज, आपल्या घातक स्पेलने फलंदाजांना आणणार अडचणीत)

जैस्वाल-रोहितच्या नजरा एका रेकॉर्डवर

रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांना बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत यावर्षी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू बनण्याची इच्छा आहे. सध्या या वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये यशस्वी जैस्वाल तिसऱ्या स्थानावर तर भारतीय कर्णधार रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे.

रोहित 1000 धावा पूर्ण करण्याच्या जवळ आहे

रोहित शर्माने 20 सामन्यात 45 च्या सरासरीने 990 धावा केल्या आहेत. तो 1000 धावांपासून फक्त 10 धावा दूर आहे. रोहितने यावर्षी तीन शतके आणि सहा अर्धशतके झळकावली आहेत. तिथे तो दोन वेळा शुन्यावरही बाद झाला आहे. यशस्वी जैस्वालने यापूर्वीच 1000 चा आकडा गाठला आहे. जैस्वालच्या नावावर यावर्षी 14 सामन्यात 1033 धावा आहेत. या कालावधीत त्याची सरासरी 60.76 इतकी आहे. यावर्षी त्याच्या नावावर पाच अर्धशतके आणि दोन शतके आहेत.

श्रीलंकेचे खेळाडू अव्वल स्थानावर आहेत

या यादीतील पहिल्या दोन स्थानांवर श्रीलंकेच्या फलंदाजांनी कब्जा केला आहे. पथुम निसांका शीर्षस्थानी आहे. त्याने यावर्षी 23 सामने खेळले असून 54.04 च्या सरासरीने 1135 धावा केल्या आहेत. या काळात त्याने चार शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कुसल मेंडिसने 32 सामन्यांत 31.74 च्या सरासरीने 1111 धावा केल्या आहेत. मेंडिसची सात अर्धशतके आहेत. जैस्वाल आणि रोहित शर्मा, पथुमा निसांकापासून दूर नाही. बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी खेळून दोघेही पहिले स्थान मिळवू शकतात. रोहित शर्माच्या बाबतीत, तो पथुम निसांकाच्या शतकांशीही बरोबरी करू शकतो!