Mumbai Indians Goes Global (Photo credit: Twitter)

MI Buy Stake In Oval Invincibles: द हंड्रेड लीग टीम ओव्हल इनव्हिन्सिबल्सची मालकी असलेल्या लंडनस्थित सरे काउंटी क्रिकेट क्लब (SCCC) ने फ्रँचायझीमध्ये 51 टक्के हिस्सा कायम ठेवण्याची घोषणा केली आहे. 2025 च्या अखेरीस जेव्हा ओव्हल इन्व्हिन्सिबल्सची मालकी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) कडून सरे काउंटी क्लबकडे हस्तांतरित केली जाईल तेव्हा भारताच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची उपकंपनी राईज वर्ल्डवाइड संघाची भागीदार असेल. सरे काउंटी क्लबने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, "ओव्हल इनव्हिन्सिबल्समध्ये राईज वर्ल्डवाइडला 49 टक्के हिस्सा मिळेल, तर सरेकडे 51 टक्के हिस्सा राहील. मुंबई इंडियन्सच्या अफाट अनुभवाचा आणि यशाचा फायदा क्लबला होईल अशी आशा आहे."

संघ 123 दशलक्ष पौंडांना विकला गेला

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) विकलेला ओव्हल इन्व्हिन्सिबल्स हा पहिला हंड्रेड संघ होता. त्याची एकूण किंमत 123 दशलक्ष पौंड एवढी आहे. त्यापैकी रिलायन्स इंडस्ट्रीजला 49 टक्के हिस्सेदारीसाठी सुमारे 60 दशलक्ष पौंड द्यावे लागले आहेत.

ओव्हल इन्व्हिन्सिबल्सचे यश

ओव्हल इन्व्हिन्सिबल्स हा द हंड्रेडमधील सर्वात यशस्वी संघ आहे. ज्याने चार वर्षांत चार जेतेपदे जिंकली आहेत. संघाच्या महिला संघाने पहिल्या दोन वर्षांत सलग दोनदा जेतेपद जिंकले आहे. तर पुरुष संघाने 2023 आणि 2024 मध्ये सलग दोनदा विजेतेपद पटकावले आहे. त्याच वेळी, मुंबई इंडियन्स हा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. ज्याने पाच वेळा विजेतेपद जिंकले आहे. त्यात भर पडल्याने, मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचे आता चार खंड आणि पाच देशांमध्ये एकूण सात संघ आहेत.

मुंबई इंडियन्सचा जागतिक विस्तार

या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त करताना रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अध्यक्षा नीता अंबानी म्हणाल्या, "ओव्हल इनव्हिन्सिबल्सचा मुंबई इंडियन्स कुटुंबात समावेश करणे हा आमच्यासाठी अभिमानाचा आणि खास क्षण आहे. या भागीदारीद्वारे, आम्ही भारत, न्यू यॉर्क, यूएई, दक्षिण आफ्रिका आणि आता इंग्लंडमधील आमच्या चाहत्यांच्या संपर्कात येऊ शकू."

मुंबई इंडियन्सचे अध्यक्ष आकाश अंबानी यावर म्हणाले, "सरे काउंटी क्लबसारख्या समान विचारसरणीच्या भागीदारांसोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. आम्ही आमच्या जागतिक क्रिकेट अनुभवाचा वापर संघांना नवीन उंचीवर नेण्यासाठी आणि चाहत्यांशी जोडण्यासाठी करू." सरे काउंटी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष ऑली स्लिपर म्हणाले, "आम्ही या भागीदारीबद्दल खूप विचार केला आणि आम्हाला वाटले की मुंबई इंडियन्सची भआगीदारी आमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यांचा अनुभव आमचा संघ आणखी मजबूत करेल."

ही भागीदारी इंग्लिश क्रिकेटमध्ये भारतीय कंपन्यांच्या वाढत्या सहभागाचे प्रतिबिंब आहे. यामुळे केवळ ओव्हल इन्व्हिन्सिबल्सलाच फायदा होणार नाही तर रिलायन्स इंडस्ट्रीजला इंग्लंडमध्ये त्यांच्या क्रिकेट फ्रँचायझीचा विस्तार करण्याची संधी देखील मिळेल.

..................................................

.........................................