केएल राहुल आणि क्रिस गेल (Photo Credit: PTI)

RCB vs KXIP, IPL 2020: आयपीएलच्या (IPL) 31व्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध (Kings XI Punjab) टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) 20 ओव्हरमध्ये 171 धावांपर्यंत मजल मारली आणि पंजाबपुढे 172 धावांचे लक्ष्य ठेवले जे केएल राहुलच्या (KL Rahul) किंग्स इलेव्हनने 8 विकेट राखून गाठले. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आजच्या सामन्यात आरसीबीचे गोलंदाज राहुल आणि क्रिस गेल यांच्या जोडीच्या पुढे निरुत्तर दिसले. दोंघांनी मिळून 93 धावांची भागीदारी करत किंग्स इलेव्हनला आयपीएल 2020 मधील दुसरा विजय मिळवून दिला. कर्णधार राहुल सर्वाधिक नाबाद 61 धावांचा डाव खेळला तर आयपीएल 13मधील आपला पहिला सामना खेळणारा क्रिस गेलने (Chris Gayle) आज जबरदस्त फटकेबाजी केली 45 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. मयंक अग्रवालने 25 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार मारत 45 धावा केल्या. दुसरीकडे, आरसीबीकडून एकमात्र युजवेंद्र चहलला 2 यश मिळाले. (IPL 2020: विराट कोहली व्यायाम करताना मैदानावरच थिरकला, RCB कर्णधाराचे डान्स मूव्हज सोशल मीडियावर व्हायरल, पाहा Video)

पंजाबची पहिली आणि एकमात्र विकेट मयंकच्या रूपात पडली. त्याने खूप चांगला डाव खेळला. मयंकला चहलने 45 धावांवर बोल्ड केले. पहिल्या विकेटसाठी त्याने राहुलबरोबर 78 धावांची भागीदारी केली. दरम्यान, किंग्स इलेव्हनचा हा दुसरा विजय ठरला तर आरसीबीला तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे किंग्स इलेव्हनने आपले दोन्ही विजय एकाच टीम म्हणजे आरसीबीविरुद्ध मिळवले आहेत. या दरम्यान राहुलने 37 चेंडूत अर्धशतक ठोकले, त्यांनतर गेलने देखील यंदाचे आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. 2 चेंडूत किंग्स इलेव्हनला 1 धाव हवी असताना मोक्याच्या क्षणी देवदत्त पडिक्कलने गेलला धावबाद केले.

यापूर्वी, टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या आरसीबीला क्रिस मॉरिस आणि इसुरू उदाना यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजीमुळे 171 रनपर्यंत मजल मारता आली आहे. आजच्या सामन्यात बेंगलोरचा कर्णधार विराटने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण सुरुवातीपासूनच आरसीबी फलंदाजांना संघर्ष करावा लागला. इतकंच नाही तर एबी डिव्हिलियर्स देखील चौथ्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांना पुढे पाठवण्याची आश्चर्यकारक रणनीती अवलंबली गेली जी अपयशी ठरली. रॉयल चॅलेंजर्सकडून विराटने 39 चेंडूत सर्वाधिक 48 धावा केल्या. तर 8 चेंडूत मॉरिसने 25 आणि उदानाने 5 बॉलमध्ये नाबाद 10 धावा केल्या. मॉरिस आणि उदानाने मोहम्मद शमीच्या 20व्या ओव्हरमध्ये 24 धावा लुटल्या. यात 3 षटकार आणि एका चौकारांचा समावेश होता. पंजाबकडून मुरुगन अश्विन आणि मोहम्मद शमीला 2 तर क्रिस जॉर्डन आणि अर्शदीप सिंहला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.