
Yash Dayal: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) सोबत बहुप्रतिक्षित इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 चे विजेतेपद जिंकल्यानंतर काही महिन्यांनीच, स्टार वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) गंभीर अडचणीत सापडला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, गाझियाबाद येथील एका महिलेने दयालविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये 27 वर्षीय वेगवान गोलंदाजावर लग्नाच्या बहाण्याने शोषण केल्याचा आरोप केला आहे. अहवालानुसार, ही तक्रार उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाइन तक्रार पोर्टल, इंटिग्रेटेड ग्रिव्हन्स रिड्रेसल पोर्टल (IGRS) वर दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयाने गाझियाबाद येथील इंदिरापुरम येथील सर्कल ऑफिसरकडून अहवाल मागितला आहे. पोलिसांनी आयजीआरएसवर दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी 21 जुलैपर्यंतचा वेळ दिला आहे. महिलेने महिला हेल्पलाइनवरही तक्रार दाखल केली आहे.
दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की तिचे पाच वर्षांपासून यश दयालसोबत संबंधात होते आणि त्यात तिचे मानसिक आणि शारीरिक शोषण झाले. या काळात यश दयालने तिच्याकडून पैसे घेतल्याचाही आरोप आहे. खरं तर, एफआयआरमध्ये असेही म्हटले आहे की आरसीबीच्या वेगवान गोलंदाजाने यापूर्वी अनेक महिलांसोबत असे केले होते. लग्नाचे आश्वासन देऊन त्याने तिचे भावनिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केले. तिने आपल्या कुटुंबाशी त्याची ओळख करून दिली. तक्रारदार महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर आणि तिने तक्रार दाखल केली."