Ranji Trophy: सिद्धार्थ कौल याची हॅटट्रिक, पंजाबविरुद्ध रणजी ट्रॉफीत आंध्र प्रदेश 97 धावांवर ऑल आऊट
सिद्धार्थ कौल (Photo Credit: Facebook)

मंगळवारी पटियाला येथे सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) सामन्यात पंजाबचा (Punjab) वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने (Siddharth Kaul) आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) विरुद्ध हॅटट्रिक नोंदवली. 2018 मध्ये भारतीय संघाकडून पदार्पण करणाऱ्या सिद्धार्थने रणजी सामन्यात आंध्र प्रदेशविरुद्ध हॅटट्रिकसह पाच विकेट्स घेऊन गदारोळ निर्माण केला. पंजाबचा गोलंदाज सिद्धार्थसमित विनय चौधरी (Vinay Choudhary) याच्या 3 आणि कृष्णा अलांगच्या दोन विकेटमुळे आंध्र संघ 39.4 ओव्हरमध्ये केवळ 97 धावांवर ऑलआऊट झाला. विशेष म्हणजे आंध्र प्रदेशच्या शेवटच्या तीन फलंदाजांना बाद करून सिद्धार्थने आपली हॅटट्रिक पूर्ण केली. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे पंजाबने आंध्रप्रदेश संघाला 97 धावांत गुंडाळले, जो गट अ आणि बी मधील गुणांच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. सिद्धार्थने 24 धावांवर 5 गडी बाद केले. (Ranji Trophy 2019-20: भारतीय फलंदाज वसीम जाफर ने रचला इतिहास, रणजी ट्रॉफीमध्ये 12000 धावा करणारा बनला पहिला खेळाडू)

या सामन्यात आंध्र प्रदेशने प्रथम फलंदाजी केली, मात्र संघाची सुरुवात खूप वाईट झाली. संघाने एकही धाव न करता दोन गडी गमावले, तर 16 धावांवर 4 विकेट्स गमावल्या. यात सिद्धार्थने दोन गडी बाद केले तर एक विकेट विनय चौधरीने घेतली. आंध्र प्रदेशसाठी बोडापति सुमंतने सर्वाधिक 22 धावा केल्या. याशिवाय शशिकांतने 20 धावा केल्या. संघाने एकावेळी 7 गडी गमावून 97 धावा केल्या. यानंतर सिद्धार्थने शेवटच्या तीन फलंदाज बाद करत हॅटट्रिकसह पाच विकेट्स पूर्ण केल्या.

15 दिवसांच्या आत रणजी ट्रॉफीमधील आजवरची तिसरी हॅटट्रिक आहे. यापूर्वी 27 जानेवारी रोजी,  28 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज रवी यादव प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणानंतर पहिल्या ओव्हरमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला होता. मध्य प्रदेशच्या गोलंदाजाने उत्तर प्रदेशविरुद्ध रणजी सामन्यात विक्रमी पुस्तकात आपले नाव नोंदवले. यादवच्या पराक्रमाच्या आठवडाभरापूर्वी, स्पिन अष्टपैलू शाहबाज अहमदने हॅटट्रिक घेत सहा गडी बाद करत प्रभावी कामगिरी केली. याच्या जोरावर बंगालने हैदराबादला डाव आणि 303 धावांनी पराभूत करत मोसमातील पहिला विजय मिळवून दिला होता.