Ranji Trophy: हर्षल पटेल याने मोडला राजेंद्र गोयल यांचा 36 वर्ष  जुना रेकॉर्ड, एका मोसमात घेतल्या सर्वाधिक विकेट्स
हर्षल पटेल (Photo Credit: Twitter/BCCIdomestic)

यंदाच्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) मोसमात खेडूळाडूंकडून नवनवीन विक्रमांची नोंद होताना दिसत आहे. हरियाणा (Haryana) आणि आसाम (Assam) विरुद्ध सामन्यात अष्टपैलू हर्षल पटेल (Harshal Patel) याने आठ विकेट्स घेतल्या आणि रणजी स्पर्धेच्या मोसमात राज्यासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमाची नोंद केली. राजेंद्र गोयल (Rajendra Goyal) याने 36 वर्षांपूर्वी हरियाणासाठी एका मोसमात सर्वाधिक विकेट्सचा विक्रम नोंदवला होता. गोयलने 1983-84 च्या रणजी स्पर्धेत हरियाणाकडून 48 गडी बाद केले होते. दुसरीकडे, आजवर हर्षलने रणजीच्या या मोसमात आठ सामन्यांमध्ये 51 गडी बाद केले आहेत. जुना विक्रम मोडल्याबद्दल गोयल यांनी स्वतः हर्षलचे अभिनंदन केले. दरम्यान, 2019-20 मध्ये हरियाणाने आजवर रणजी एकूण आठ सामने खेळले असून चारमध्ये विजय, तर चारमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

पटेलने आठ सामन्यांत 51 गडी बाद केले असून रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. यापूर्वी 1983-84 मध्ये गोयलने (डावखुरा फिरकीपटू) 48 विकेट्स घेतल्या होत्या. पटेलने टीमसाठी एका डावात सर्वश्रेष्ठ स्ट्राइक रेट, सामन्याच्या एका दावत चारवेळा पांच-पांच आणि एकवेळा 10 विकेट्स आणि एका सामन्यात सर्वश्रेष्ठ गोलंदाजीचं प्रदर्शन केले आहे. त्याने त्रिपुराविरुद्ध 18 ओव्हरमध्ये 53 धावा देऊन 12 विकेट्स घेतल्या होत्या.

आसामनंतर हरियाणाचा सामना जम्मू-काश्मीरशी होणार असून या सामन्यात जर हर्षलने 9 गडी बाद केले तर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये सामील होईल. या हंगामात तो सध्या संयुक्तपणे 31 व्या स्थानावर आहे. रणजी ट्रॉफीच्या गट सी सामन्यात हरयाणाने आसामवर सात गडी राखून विजय मिळविला. चार दिवसांचा हा सामना अवघ्या दोन दिवसात संपुष्टात आला. विजयासाठी 97 धावांचा पाठलाग करताना हरियाणाने 20 ओव्हरमध्ये तीन गडी गमावून लक्ष्य गाठले आणि सहा गुणांची कमाई केली.