अनस्तुप मजूमदार आणि आकाश दीप (Photo Credit: IANS)

कोलकाताच्या (Kolkata) ईडन गार्डन स्टेडियमवर रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2019-20 चा दुसरा उपांत्य सामना बंगाल (Bengal) आणि कर्नाटक (Karnataka) संघात खेळण्यात आला.यजमान बंगालसमोर कर्नाटकचा एक मजबूत संघ होता, परंतु या उपांत्य सामन्यात बंगालने कर्नाटकला पराभूत केले आणि 14 वर्षांनंतर बंगाल संघाने रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. बंगाल आणि कर्नाटकमधील सेमीफायनल सामन्यात कर्नाटक संघाचा कर्णधार करुण नायरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. अशा स्थितीत बंगालने पहिले फलंदाजी करत पहिल्या डावात 92 ओव्हरची फलंदाजी केली आणि 312 धावा केल्या. या खेळीत अनस्तूप मजूमदारने (Anustup Majumdar) 207 चेंडूत 149 धावा केल्या, आकाश दीपने (Akash Deep) 44 आणि शाहबाज अहमद 35 धावा करून बाद झाला. दुसरीकडे, कर्नाटककडून अभिमन्यू मिथुन आणि रोनित मोरे यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

बंगाल संघाने अखेरीस 2006-07 मध्ये फायनल फेरीत प्रवेश केला होता, जेथे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 14 वर्षांनंतर अंतिम फेरी गाठणाऱ्या बंगालने 1938-39 आणि 1989-90 मध्ये विजेतेपद जिंकले होते. दरम्यान, कर्नाटकचा संघ दोन्ही डावात 200 धावांचा टप्पाही पार करू शकला नाही. कर्नाटकचा पहिला डाव 36.2 षटकांत 122 धावांवर संपुष्टात आला. अशा प्रकारे बंगालने पहिल्या डावाच्या जोरावर 190 धावांची आघाडी घेतली. केएल राहुल कर्नाटककडून सलामीला आला, परंतु त्याला पहिल्या डावात 26 आणि दुसऱ्या डावात खाते न उघडता माघारी परतला. कर्नाटकच्या कृष्णप्पा गौतमने 31 धावा केल्या. बंगालकडून ईशान पोरेलने 5, आकाश दीपने 3 आणि मुकेश कुमारने 2 गडी बाद केले.

मात्र त्यानंतर कर्नाटकच्या गोलंदाजांनी सामन्यात संघाला पुनरागमन करू दिले आणि बंगाल संघाला 161 धावांवर गुंडाळले. पहिल्या डावातील शतकवीर मजूमदार 41 धावांवर बाद झाला. कर्नाटकला 352 धावांचे लक्ष्य मिळाले. याच्या प्रत्युत्तरात त्यांचा संघ 177 धावांवर ऑलआऊट झाला आणि बंगालने 174 धावांनी विजय मिळवला. यासह बंगालच्या संघाने 2007 नंतर प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला.