Ranji Trophy 2022: तामिळनाडूच्या जुळ्या भावांचा देशांतर्गत स्पर्धेत धमाल, रणजीच्या मैदानात अशी कमाल करणारे ठरले पहिले जुळे भाऊ
बाबा अपराजित (Photo Credit: PTI)

Ranji Trophy 2022: तामिळनाडूचे जुळे भाऊ बाबा अपराजित आणि बाबा इंद्रजित यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील संघाविरुद्ध एकाच सामन्यात शतक ठोकणारे ते पहिले भारतीय जुळे भाऊ ठरले आहेत. दोन्ही भावांनी रणजी ट्रॉफीमध्ये छत्तीसगड विरुद्ध एलिट ग्रुप एच सामन्यात शतके झळकावून ही कामगिरी केली. इंद्रजीतने 141 चेंडूत 21 चौकारांसह 127 धावा केल्या, तर गुरुवारी पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत अपराजित 101 धावांवर नाबाद राहिला. अपराजितचे 10वे शतक आहे तर इंद्रजीतचे प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील 11वे शतक आहे.

गुवाहाटी येथील नेहरू स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात दोन्ही भावांच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर तामिळनाडूने पहिल्या दिवशी आपली स्थिती मजबूत केली. संघाने 4 बाद 308 धावा केल्या होत्या. बाबा बंधूंनी तिसऱ्या विकेटसाठी 205 धावांची भागीदारी केली. अपराजितने 197 चेंडूत 127 धावा केल्या तर इंद्रजितने 141 चेंडूत 127 धावा केल्या. तत्पूर्वी, या सामन्यात तामिळनाडूचा कर्णधार विजय शंकरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर कौशिक गांधी 27 धावांवर तर लक्ष्मीशा 21 धावा करून बाद झाले. यानंतर जुळ्या ‘बाबा’ बंधूंच्या जोडीने संघाची कमान हाती घेत धावसंख्या 250 धावापार नेली. तामिळनाडू फलंदाज बाबा अपराजित आणि बाबा इंद्रजित हे दोघे जुळे भाऊ आहेत. दोघांनी 11 वर्षांपूर्वी प्रथम श्रेणी पदार्पण केले होते, परंतु आतापर्यंत या दोघांनाही भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. दोघांनीही तिन्ही फॉरमॅटमध्ये 29 शतके झळकावली आहेत.

सामन्याबद्दल बोलायचे तर तमिळनाडूने नाणेफेक जिंकून छत्तीसगडविरुद्ध फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर कौशिक गांधी आणि लक्ष्मीशा सूर्यप्रकाश यांच्या विकेट लवकर पडल्या. कौशिक 27 धावांवर धावबाद झाला तेव्हा अजय मंडलने 21 धावांवर लक्ष्मीशाला बाद केले. यानंतर बाबा जुळ्या भावांच्या जोडीने मोर्चा सांभाळला. अपराजित आणि इंद्रजितची ही जोडी छत्तीसगढवर वर्चस्व गाजवत असताना अजय मंडलने आक्रमक फलंदाजी करणाऱ्या इंद्रजितला 127 धावांत पॅव्हिलियनमध्ये धाडलं आणि संघाला मोठा दिलासा मिळवून दिला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार विजयला खातेही उघडता आले नाही.