Ranji Trophy 2022: भारताचा तडाखेबाज कसोटी फलंदाज अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) गेले काही वर्ष कठीण ठरले आहेत, कारण त्याच्या बॅटने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये धावा केल्या नाहीत आणि त्यामुळे त्याच्याकडून भारताच्या कसोटी संघाचे उपकर्णधारपदही काढून घेण्यात आले. त्याला कसोटी संघातून वगळण्याचीही चर्चा सुरु आहे, मात्र यादरम्यान त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आणखी एक शतक झळकावले आहे. खराब कामगिरीमुळे भारतीय कसोटी संघातून वगळण्याच्या मार्गावर असलेल्या रहाणेने दमदार खेळी केली आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या मालिकेतील खराब कामगिरीनंतर त्याच्यावर संघातून वगळण्याची टांगती तलवार होती. मात्र, रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) सौराष्ट्रविरुद्ध पहिला सामना खेळण्यासाठी उतरलेल्या मुंबईकर फलंदाजाने दमदार शतक झळकावले आणि समीक्षकांना सडेतोड उत्तर दिले. (Ranji Trophy 2022: पदार्पणात सामन्यात भारताचा U19 कर्णधार Yash Dhull याचा डंका, तामिळनाडूविरुद्ध केल्या ताबडतोड धावा Watch Video)
रहाणेने रणजी ट्रॉफी 2022 हंगामात सौराष्ट्र (Saurashtra) विरुद्ध मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियम ग्राउंड ए येथे शतक केले. मात्र येथे अजिंक्य रहाणेने नैसर्गिक खेळ करत 211 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांसह प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 36 वे शतक पूर्ण केले. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील अजिंक्य रहाणेचे हे 24 वे शतक आहे. सौराष्ट्र विरुद्ध मुंबई संघाची धावसंख्या 22 धावांवर दोन बाद असताना रहाणे फलंदाजीला आला. कर्णधार पृथ्वी शॉ 1 धावा करून बाद झाला तर ड्रू गोमेल 8 धावांवर माघारी परतला. यानंतर रहाणेने प्रथम एसएम यादवच्या साथीने डावाची धुरा सांभाळली, मात्र तो 19 धावांवर बाद झाला. तथापि रहाणेला सरफराज खानने साथ दिली. सरफराजही शतकाकडे वाटचाल करत आहे. दरम्यान, रहाणेची ही शतकी खेळी आता त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळवून देण्यात यशस्वी ठरणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.
Ajinkya Rahane 100 runs in 211 balls (14x4, 2x6) Mumbai 219/3 #SAUvMUM #RanjiTrophy Scorecard:https://t.co/OGykcjFiyX
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 17, 2022
ऑस्ट्रेलियातील भारतीय संघाच्या कसोटी मालिकेचा नायक अजिंक्य कडून दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी उपकर्णधार पद काढून घेण्यात आले. इतकंच नाही तर गेल्या काही महिन्यांच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या हकालपट्टी करण्याचा विचार केला जात आहे. अशा परिस्थितीत रणजीच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावून या फलंदाजाने पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मायदेशातील कसोटी मालिकेसाठीचा दावा मजबूत केला आहे.