PAK vs AUS Semi-Final, ICC T20 WC 2021: अजेय पाकिस्तानचे स्वप्न भंगले, विजयरथावर ऑस्ट्रेलियाने लावला ब्रेक; आता जेतेपदासाठी न्यूझीलंडशी गाठ
मार्कस स्टोइनिस (Photo Credit: Twitter/ICC)

ICC T20 World Cup 2021: मार्कस स्टॉइनिस (Marcus Stoinis) आणि मॅथ्यू वेड (Matthew Wade) यांच्या जबरदस्त फटकेबाजीच्या जोरावर आयसीसी टी-20 विश्वचषकच्या  (ICC T20 World Cup) दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) आयसीसी बाद फेरीत पाकिस्तानवरील (Pakistan) आपले वर्चस्व कायम ठेवले आणि पाच विकेटने दणदणीत विजय मिळवून जेतेपदाच्या अंतिम सामन्यात धडक मारली. पाकिस्तानने दिलेल्या 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारू संघाने 19 षटकात धमाकेदार विजय मिळवला आणि सुपर-12 मध्ये अजेय राहिलेल्या पाकिस्तानचे स्वप्न एका पराभवाने चक्काचूर झाले. आता आरोन फिंचच्या कांगारू संघाचा सामना न्यूझीलंडशी (New Zealand) होईल. ऑस्ट्रेलियाच्या विजयात स्टोइनिस आणि वेडसह सलामीवीर डेविड वॉर्नर यांनीही महत्वपूर्ण भूमिका बजावली. स्टोइनिस 40 धावा तर वेड 41 धावा करून नाबाद राहिले. तसेच वॉर्नरने 30 चेंडूत 49 धावांची संयमी खेळी केली. दुसरीकडे, पाकिस्तानसाठी शादाब खानने (Shadab Khan) सर्वाधिक चार विकेट घेतल्या. याशिवाय स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने एक गडी बाद केला. पण ते संघाला विजय मिळवून देण्यास पुरेसे ठरले नाही. (PAK vs AUS Semi-Final, T20 WC 2021: बाबर आजम-मोहम्मद रिझवानच्या जोडीची कमाल, टी-20 विश्वचषकात केली सर्वात मोठी कामगिरी)

ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचने टॉस जिंकून पाकिस्तानला फलंदाजीने आमंत्रण दिले होते. पण फिंचचा तो निर्णय चुकीचा ठरला. पाकिस्तानने दिलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या ऑसी संघाने पहिल्याच षटकांत कर्णधार फिंचच्या रूपात पहिली विकेट गमावली. फिंच भोपळाही फोडू शकला नाही. त्यानंतर वॉर्नर आणि मिचेल मार्शने अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरला. दोघे संघासाठी घातक ठरत असताना शादाब खानने मार्शचा अडथळा दूर केला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेला स्टिव्ह स्मिथ वॉर्नरला जास्त वेळ साथ देऊ शकला नाही आणि फक्त 5 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा डाव एकहाती सांभाळणारा वॉर्नरही शादाब खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. वॉर्नरने 49 धावा केल्या. स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलच्या अपयशाचे सत्र यंदा देखील सुरूच राहिले. खानने त्याला 7 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडले. मार्कस स्टोइनिस आणि मॅथ्यू वेड यांनी जोडी जमवली आणि संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या. मोक्याच्या क्षणी मॅथ्यू वेडने जबरदस्त षटकार खेचून संघाला विजयीरेष ओलंडून दिली. त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.

यासह आता 14 नोव्हेंबर रोजी जेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाची गाठ न्यूझीलंडशी असेल. विल्यम्सनच्या किवी संघाने आयसीसी स्पर्धेत जबरदस्त ‘शो’ कायम ठेवत टी- विश्वचषकच्या पहिल्या तर आयसीसीच्या वनडे आणि कसोटीनंतर तिसऱ्या वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश केला आहे.