On This Day in 2013: तीनही ICC ट्रॉफी जिंकणारा एमएस धोनी ठरला पहिला कर्णधार, मिळवला चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपदाची मान
चॅम्पिअन्स ट्रॉफी 2013 (Photo Credit: Twitter)

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्यासाठी आजचा दिवस अगदी खास आहे. आजच्या दिवशी म्हणजेच 23 जून 2013 रोजी धोनीने अशी कामगिरी केली जी आजवर कोणत्याही कर्णधाराला जमली नाही आणि कदाचित यापुढे कोणताही कर्णधार करू शकणार नाही. 23 जून 2013 रोजी भारताने (India) इंग्लंडचा (England) पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) जेतेपदाचा मान मिळवला होता. ही स्पर्धा जिंकताच धोनी आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकणारा पहिला आणि अखेरचा कर्णधार ठरला. धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 टी-20, 2011 वनडे वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या जेतेपदाची मान मिळवला. 50 ओव्हरचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे 20 ओव्हरचा करण्यात आला. अंतिम सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकूला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आणि धोनीच्या नेतृत्वात टीमने 20 ओव्हरमध्ये 129 धावांवर 7 बाद असा स्कोर केला. सामन्यात विराट कोहली भारताकडून सर्वाधिक 34 चेंडूत 43 धावा केल्या. यामध्ये 4 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.

अखेरच्या काही ओव्हरमध्ये रवींद्र जडेजाने मोठे शॉट्स मारून 33 धावा केल्या आणि टीमचा स्कोर 120 धावांच्या पार नेला. इंग्लंडकडून रवि बोपाराने सर्वाधिक 3 गडी बाद केले. भारताने दिलेल्या 130 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडने 8 ओव्हरमध्ये 46 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. अ‍ॅलिस्टर कुक, जोनाथन ट्रॉट, इयान बेल आणि जो रूट स्वस्तात माघारी परतले. त्यांनतर इयन मॉर्गन आणि बोपाराने डाव सावरत दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी झाली. जिंकण्यासाठी 20 धावा कमी असताना मॉर्गनने 33 आणि बोपाराने 30 धावांवर आपली विकेट गमावली. त्यानंतर इंग्लंड टीम धक्क्यातून सावरू शकली नाही आणि जेतेपद 5 धावांनी हुकले.

या विजयासह, एमएस धोनी क्रिकेट इतिहासातील सर्व प्रमुख आयसीसी ट्रॉफी (50 ओव्हर वर्ल्ड कप, 20 ओव्हर वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा पहिला कर्णधार ठरला. शिखर धवनला प्लेअर ऑफ द सिरीज निवडले गेले तर रवींद्र जडेजा सामनावीर ठरला.