MS Dhoni Birthday Special: एमएस धोनीच्या ‘या’ 5 निर्णयाने बदलला भारतीय क्रिकेटचा चेहरा

MS Dhoni Bold Decisions: एमएस धोनी (MS Dhoni) हा भारतीय क्रिकेटमधील (Indian Cricket) उत्तम कर्णधारांपैकी एक ठरला आहे. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच मोठ्या स्पर्धेत 2007 मध्ये आयसीसी टी-20 वर्ल्ड कप विजेतेपदाचा मान मिळवलेल्या धोनीने पुढे जाऊन टीम इंडिया (Team India) कर्णधार म्हणून बरीच प्रशंसा मिळवली. टी-20 विश्वचषक, वनडे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) अशा आयसीसीचे (ICC) तीनही विजेतेपद मिळविणारा विकेटकीपर-फलंदाज धोनी एकमेव कर्णधार आहे. एमएस धोनीने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मैदानावर आपल्या शांत आणि दबावमुक्त वागण्यामुळे धोनीला ‘कर्णधार कूल’ म्हणून संबोधले जाते. मात्र धोनी धाडसी निर्णय घेण्यासाठी देखील प्रसिद्ध होता. (MS Dhoni Birthday: ‘या’ 3 प्रसंगी ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीला झाला होता राग अनावर, खेळाडूच नाही तर पंचांशी झाली होती ‘तू तू…मै मै’)

धोनीने मैदानावरील आपल्या धाडसी निर्याणाच्या जोरावर भारतीय क्रिकेटचा चेहराच बदलून टाकला आणि एका नवीन युगाची सुरुवात केली. टीम इंडियाचा लाडका माजी कर्णधार धोनी आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे त्यानिमित्त आपण धोनीच्या 5 निर्णयांबाबत जाणून घेऊया ज्याने भारतीय क्रिकेटचे नशीब बदलले.

2007 टी-20 वर्ल्ड कप फायनल

आयसीसी टी-20 विश्वचषक 2007 मध्ये धोनीने प्रथमच कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामन्यात भारताला अखेरच्या षटकात 13 धावांचा बचाव करण्याची गरज होती. पाकिस्तानसाठी त्यांचा अनुभवी फलंदाज मिसबाह-उल-हक क्रीजवर होता परंतु त्यांची फक्त 1 विकेट शिल्लक होती. अनुभवी हरभजन सिंह ऐवजी धोनीने जोगिंदर शर्माला चेंडू देण्याचा निर्णय घेतला. शर्माने वाइड बॉलने सुरुवात केली ज्यानंतर त्याने षटकार खाल्ला. यामुळे त्याच्यावर दबाव आला मात्र, पुढच्याच चेंडूवर मिस्बाहला श्रीशांतने शॉर्ट फाईन लेगवर झेलबाद केले. अशाप्रकारे धोनीने शर्माला चेंडू देण्याचा धाडसी निर्णय यशस्वी ठरला.

वनडे विश्वचषक 2011 अंतिम

2011 वर्ल्ड कप सामन्यात श्रीलंकेने भारताला 275 धावांचे आव्हान दिले होते. युवराज सिंहने या स्पर्धेदरम्यान पाचव्या स्थानावर फलंदाजी केली होती. मात्र विराट कोहली बाद झाल्यावर धोनी युवराज ऐवजी पाचव्या स्थानावर फलंदाजीला उतरला. धोनी फलंदाजीला आला तेव्हा भारताला विजयासाठी आणखी 161 धावांची आवश्यकता होती. धोनीने जबाबदारी चोख पार पाडली आणि नाबाद 91 धावा फटकावून भारताला 6 विकेट्सने विजय मिळवून दिला. तसेच त्याने गौतम गंभीरबरोबर एक उत्तम भागीदारी केली जी भारताच्या विजयासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 फायनल

भारत विरुद्ध इंग्लड 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे दोन्ही डावात प्रत्येकी 20 ओव्हरचा सामना रंगला. टीम इंडियाने पहिले फलंदाजी करून 129-7 धावांपर्यंत मजल मारली. धोनीने इशांत शर्माला 18 वी ओव्हर देण्याचा धाडसी निर्णय घेतला जो यापूर्वी सामन्यात थोडा महागडा ठरला होता. मात्र धोनीचा निर्णय फलदायी ठरला कारण शर्माने रवी बोपारा आणि इयन मॉर्गनला त्याच षटकात बाद केले. त्यांची 64 धावांची भागीदारी संपुष्टात आली आणि सामन्यात भारताने वर्चस्व मिळवले. अखेरीस, भारताने सामना 5 धावांनी जिंकला. अशाप्रकारे धोनी आयसीसीचे तीनही विजेतेपद पटकावणारा एकमेव कर्णधार ठरला.

सलामीवीर म्हणून रोहित शर्माला बढती

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी2013 मध्ये धोनीने सलामीवीर म्हणून पदोन्नती दिल्यानंतर रोहितचे करिअर बदलले. 2007 मध्ये रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते पण सुरुवातीच्या वर्षांत कारकिर्दीत त्याला त्रास सहन करावा लागला. सुरुवातीच्या काळात तो मधल्या फळीत फलंदाजी करीत असे. त्यानंतर धोनीने रोहितला सलामीला फलंदाजी करण्यार सांगितले. 2013 मध्ये सलामीवीर म्हणून पदोन्नती दिल्यावर रोहितने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि भारताचा अव्वल सलामीवीर म्हणून उदयास आला. तसेच एकदिवसीय सामन्यात तीन दुहेरी शतके ठोकणारा तो एकमेव फलंदाज आहे.

नवीन कर्णधार म्हणून विराट कोहलीची निवड

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत धोनीने डिसेंबर 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती पण तो वनडे आणि टी-20 संघांचे नेतृत्व करत राहिला. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहलीला नवा कर्णधार म्हणून निवडण्यावर त्याने भर दिला. शिवाय, मर्यादित षटकांच्या सामन्यादरम्यान त्याने विराटला नेतृत्व कौशल्य शिकण्यास मदत केली. हळूहळू त्याने टी-20 आणि वनडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी कोहलीला दिली. या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटचे नशिब बदलले आणि कोहली तिन्ही स्वरूपात भारताचा अव्वल कर्णधार म्हणून उदयास आला आहे.