लॉकडाउन संपल्यावर सचिन तेंडुलकर याच्या 'या' विक्रमांवर विराट कोहलीचा डोळा, यंदा करू शकतो मास्टर-ब्लास्टरच्या वनडेमधील मोठ्या रेकॉर्डची बरोबरी
विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर (Photo Credit: Getty Images)

कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्वत्र क्रिकेट स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. खेळाडू पुन्हा एकदा मैदानावर तर प्रेक्षकही लॉकडाउननंतर (Lockdown) क्रिकेट सुरु होण्याची प्रतीक्षा करत आहेत. लॉकडाउन संपल्यावर क्रिकेट पुन्हा सुरु झाल्यास रेकॉर्डचा बादशाह सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचे काही रेकॉर्ड रन-मशीन विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर होऊ शकतात. सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा अनेक विक्रमांची नोंद आहे जे मोडणे कोणत्याही फलंदाजाला कठीण काम असणार आहे. दुसरीकडे, विराटने मागील काही वर्षात आपल्या फलंदाजीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि चाहते सचिनचा विक्रम मोडण्यासाठी विराट हा सर्वात जवळचा उमेदवार असल्याचे मनात आहे. विराट सध्या सचिनचे काही रेकॉर्ड मोडण्याच्या अगदी जवळ आहे आणि लॉकडाउन संपताच तो आपल्या नावावर करू शकतो. (बेन स्टोक्सने एमएस धोनी याच्या खेळाडूवृत्तीवर केला प्रश्न, टीम इंडियाच्या 2019 वर्ल्ड कप पराभवाचे 'या' 3 खेळाडूंवर फोडले खापर)

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 शतकं ठोकली आहेत, जे विश्व क्रिकेटमध्ये एक रेकॉर्ड आहे. विराटने 70 शतकांसह सचिनच्या विक्रमापासून बराच लांब आहे. मात्र, वनडे क्रिकेटमधील सचिनचा 49 वनडे शतकांच्या विक्रमाची विराट यंदा किंवा येत्या काही वर्षात बरोबरी करेल अशी अपेक्षा आहे. विराटने वनडे कारकिर्दीत आजवर 43 शतकं ठोकली आहेत. शिवाय, घरच्या मैदानावर खेळताना सचिनच्या सर्वाधिक 20 शतकांची बरोबरी करण्यासाठी विराटला एका शतकांची गरज आहे. विराटने भारतात एकूण 19 आंतरराष्ट्रीय शतकं केली आहेत. क्रिकेट सुरु झाल्यानंतर विराट सचिनचा हा विक्रमदेखील सर्वप्रथम मोडू शकतो.

शिवाय, सचिनने 300 डावांमध्ये 12000 वनडे धावांचा विक्रम नोंदविला होता. तर कोहलीने 248 सामन्यांच्या 239 डावात 11,837 धावा केल्या आहेत आणि तो सचिनचा हा विक्रम मोडण्यापासून फक्त 133 धावा मागे आहे. दुसरीकडे, कसोटी क्रिकेटमध्ये विराटने मागील काही काळात सर्वांना प्रभावित केले आहे. 2018-19 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टेस्ट मालिका जिंकणारा तो पहिला कर्णधार होता आणि यंदा पुन्हा टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि शतकं विराट नोंदवू शकतो. विराट-सचिनने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीत प्रत्येकी 6 शतकं ठोकली आहेत. तर कांगारू देशात सचिनने 1,809 आणि विराटने 1,274 कसोटी धावा केल्या आहेत. अशाप्रकारे तो सचिनच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून 535 धावा दूर आहे.