Mohammed Siraj (Photo Credit: Twitter)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात निवड झालेल्या मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याच्या वडिलांचे आज निधन झाले आहे. सिराजचे वडील मोहम्मद घौस (Mohammed Ghouse) हे प्रदीर्घ काळापासून फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांनी वयाच्या 53 व्या वर्षी हैदराबादच्या (Hyderabad) एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. सिडनीत सराव करत असताना सिराजला आपल्या वडिलांच्या निधनाविषयी माहिती समजली. मात्र, क्वारंटाईनच्या नियमांमुळे त्याला आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जाता येणार नाही, अशीही माहिती समोर आली आहे.

आपल्या वडिलांच्या निधनांची बातमी कळताच सिराज म्हणाला की, माझे वडील नेहमी म्हणायचे की एकदिवस माझा मुलगा देशाचे नाव मोठे करेल. मला देशाकडून खेळताना पाहणे हे त्यांचे स्वप्न होते. मी आता त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घेईल. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी रिक्षा चालवत अनेक कष्ठ केली आहेत. माझ्यासाठी ही खरेच धक्कादायक गोष्ट होती. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार मी गमावला आहे, असेही तो म्हणाला आहे. आयपीएलच्या मागील हंगामात चांगले प्रदर्शन केल्यानंतर तो भारतीय संघातही जबरदस्त कामगिरी करून दाखवेल, अशी अपेक्षा केली जात आहे. हे देखील वाचा- ICC ची मोठी घोषणा, 15 वर्षाखालील खेळाडूंवर आंतरराष्ट्रीय किंवा Under-19 क्रिकेट खेळण्यावर घातली बंदी

मोहम्मद सिराजने 2016-17 मध्ये रणजी हंगामात खेळत असताना त्याने 41 विकेट्स पटकावल्या होत्या. त्यानतंर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात त्याला जागा मिळाली होती. त्याने नुकताच युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या सामन्यात आक्रमक गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मोहम्मह सिराजने आतापर्यंत 1 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळले आहेत. तर, आयपीएलचे 35 सामने त्याने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने खाते उघडले नसून टी-20 सामन्यात त्याने 3 विकेट्स घेतले आहेत. तर, आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 39 विकेट्सची नोंद आहे.