MI vs SRH, IPL 2020: चौकार-षटकारांच्या आतिषबाजीत MIने मारली बाजी, हैदराबादचा 34 धावांनी उडवला धुव्वा; डेविड वॉर्नरची झुंज व्यर्थ
मुंबई इंडियन्स (Photo Credit: Twitter/IPL)

MI vs SRH, IPL 2020: शारजाह येथे मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पहिले फलंदाजी करून दिलेल्या 209 धावांच्या प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) 34 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईने दिलेल्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या हैदराबादला 175 धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादकडून कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) अर्धशतक ठोकले आणि 60 धावा केल्या. मनीष पांडेने 30 आणि जॉनी बेअरस्टोने 25 धावा केल्या. अब्दुल समदने 20 धावा केल्या. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह  (Jasprir Bumrah) आणि जेम्स पॅटिन्सन (James Pattinson) यांनी प्रत्येकी 2, कृणाल पांड्याने 1 गडी बाद केला. आजच्या सामन्यातील विजयासह मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थान गाठले आहे. हैदराबादला या पराभवाने गुणतालिकेत नुकसान झाले आणि ते स्थानावर घसरले आहेत. मुंबई इंडियन्सचा 5 डावातील हा तिसरा विजय ठरला तर हैदराबादने पाचपैकी तीन सामने गमावले आणि 2 सामन्यात विजय नोंदवला आहे. (MI vs SRH, IPL 2020: सुपरमॅन-ईश! मनीष पांडेच्या डायविंग कॅच वर नेटकरी फिदा, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिली अशी प्रतिक्रिया Watch Video)

हैदराबादकडून वॉर्नर आणि बेअरस्टोच्या जोडीने जबरदस्त सुरुवात केली. वॉर्नर सावध खेळ करत असताना बेअरस्टो मोठे फटके खेळत राहिला, पण तो मोठा डाव खेळू शकला नाही आणि मुंबईच्या बोल्टने 25 धावांवर बाद केले. त्यानंतर वॉर्नर आणि मनीष पांडेच्या जोडीने टीमचा डाव सावरला. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात पांडे झेलबाद झाला. केन विल्यमसन देखील वॉर्नरला जास्त काळ साथ देऊ शकला नाही 3 धाव करून माघारी परतला. या दरम्यान वॉर्नरने यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक ठोकले. पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर 60 धावा काढून वॉर्नर बाद झाला. हैदराबादकडून वॉर्नरने सर्वाधिक धावा केल्या. प्रियम गर्ग धावा करून 8 बाद झाला. बाउंड्री लाईनवर राहुल चाहरने अप्रतिम कॅच पकडला आणि प्रियमचा डाव संपुष्टात आणला. अभिषेक शर्मा 10 धावा करून त्रिफळाचीत होऊन माघारी परतला.

यापूर्वी, क्विंटन डी-कॉकचे अर्धशतक आणि अखेरच्या षटकांत कीरोन पोलार्ड व पांड्या बंधूंच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सामन्यात 208 धावांपर्यंत मजल मारली आणि विजयासाठी हैदराबादसमोर 209 धावांचं आव्हान दिल होतं. हैदराबादकडून संदीप शर्मा आणि सिद्धार्थ कौल यांनी प्रत्येकी 2 तर रशीद खान 1 गडी बाद केला.