MI vs KXIP, IPL 2020: क्विंटन डी कॉकचे झुंझार अर्धशतक, कीरोन पोलार्डच्या फटकेबाजीने MIचे किंग्स इलेव्हनसमोर 177 धावांचे लक्ष्य
क्विंटन डी कॉक आणि क्रुणाल पांड्या (Photo Credit: PTI)

MI vs KXIP, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 36व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत सलामी फलंदाज क्विंटन डी कॉकच्या (Quinton de Kock) अर्धशतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 176 धावांपर्यंत मजल मारली आणि किंग्स इलेव्हन पंजाबपुढे (Kings XI Punjab) विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य ठेवले. किंग्स इलेव्हनविरुद्ध आजच्या सामन्यात मुंबईचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. आघाडीचे तीन फलंदाज एकेरी धावसंख्येवर माघारी परतले तर डी कॉक एकाकी झुंज देत राहिला आणि सर्वाधिक 53 धावा केल्या. डी कॉक वगळता कृणाल पांड्याने (Krunal Pandya) 34 धावांचे योगदान दिले. कीरोन पोलार्ड (Kieron Pollard) नाबाद 34 आणि नॅथन कोल्टर-नाईल (Nathan Coulter-Nile) नाबाद 24 धावा करून परातले. अखेरच्या फळीत पोलार्ड आणि नॅथन कोल्टर-नाईल जोडीने फटकेबाजीच्या मदतीने अर्धशतकी भागीदारी करत मुंबईला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. दुसरीकडे, पंजाबच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला आणि मुंबईला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. किंग्स इलेव्हनसाठी अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 2 तर रवी बिश्नोई आणि क्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. (SRH vs KKR, IPL 2020: एक नंबर! डेविड वॉर्नरने उद्ध्वस्त केला विराट कोहलीचा रेकॉर्ड, परदेशी खेळाडूंमध्येही मिळवले पहिले स्थान)

पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला. रोहितच्या अपयसाची मालिका सुरूच राहिली. अर्शदीप सिंहच्या गोलंदाजीवक ऑफ स्टम्पच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्नात चेंडू बॅटच्या कडेला लागून थेट स्टम्पवर लागला आणि रोहित 8 चेंडूत 9 धावा करून माघारी परतला. त्यानंतर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मुरुगन श्विनकडे झेल देऊन एकही धाव न काढता सूर्यकुमार यादव माघारी परतला. अर्शदीपच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात सीमारेषेवर क्षेत्ररक्षकाकडे झेलबाद होत ईशान किशन स्वस्तात परतला. मुंबईने 60 धावांवर 3 विकेट गमावल्या असताना कृणाल पांड्याने डी कॉकसोबत 58 धावांची भागीदारी केली आणि डाव सावरला, पण 30 चेंडूत 34 धावा करून परतला. यांनतर डी कॉकने सलग तिसरे अर्धशतक ठोकले. शमीच्या गोलंदाजीवर पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात हार्दिक पांड्या 8 धावांवर झेलबाद झाला. हार्दिक पाठोपाठ 43 चेंडूत 53 धावांची खेळी करत डी-कॉकही बाद झाला.

दरम्यान, आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल केलेला नाही. आजच्या सामन्यात विजय मिळवून मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवू पाहत असेल, तर किंग्स इलेव्हनसाठी आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी जिंकणे महत्वाचे आहे.