MI vs CSK IPL 2021 Match 27: किरोन पोलार्डचे वेगवान अर्धशतक, चेन्नईच्या विजयी ‘एक्सप्रेस’वर लागला ब्रेक; मुंबई इंडियन्सने मिळवला दिमाखदार विजय
किरोन पोलार्ड (Photo Credit: PTI)

MI vs CSK IPL 2021 Match 27: चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) दिलेल्या 219 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) किरोन पोलार्डच्या (Kieron Pollard) धमाकेदार वेगवान अर्धशतकाच्या जोरावर 4 विकेटने दिमाखदार विजय मिळवला आहे.  मुंबईच्या आजच्या विजयाने चेन्नईच्या विजयरथावर ब्रेक लावला आहे. चेन्नईने यापूर्वी सलग पाच सामने जिंकले होते. शिवाय, मुंबई इंडियन्सचा हा चौथा विजय ठरला आणि यापूर्वी गतविजेत्या संघाला तीन पराभवाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, मुंबईसाठी पोलार्डने 87 धावांची शानदार नाबाद खेळी करत संघाला विजयीरेष ओलांडून दिली. याशिवाय, क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) 38 धावा तसेच कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 35 धावा आणि कृणाल पांड्याने 32 धावा केल्या. हार्दिक पांड्या 16 धावा करून परतला. दुसरीकडे, चेन्नईसाठी सॅम कुरनने (Sam Curran) 2 विकेट्स काढल्या तर रवींद्र जडेजा, मोईन अली व शार्दूल ठाकूरने प्रत्येकी 1 विकेट काढली. (MI vs CSK IPL 2021 Match 27: Kieron Pollard ने यंदाच्या हंगामातील ठोकले वेगवान अर्धशतक, पृथ्वी शॉला टाकले पिछाडीवर)

मुंबईसाठी विशाल धावसंख्येचा लक्ष्याच्या प्रत्युत्तरात डी कॉक-रोहितची जोडी मैदानात उतरली ज्यांनी पहिल्या चेंडूपासूनच आपला हेतू स्पष्ट केला. दोघांनी चौकार-षटकारांची बरसात करत मुंबईला शानदार सुरुवात मिळवून दिली. डी कॉक-रोहितमध्ये 71 धावांची भागीदारी झाली असताना ठाकूरने रोहितला 35 धावांवर रुतुराज गायकवाडच्या हाती कॅच आऊट करत मुंबईला मोठा धक्का दिला. यानंतर, जाडेजाने सूर्यकुमार यादवला विकेटच्या मागे कॅच आऊट करत पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. मोईन अलीने मुंबईला तिसरा झटका दिला आणि क्विंटन डी कॉकला कॅच आऊट केलं. मात्र, यानंतर पोलार्डने कृणालच्या साथीने सूत्रे हाती घेतली आणि चेन्नई गोलंदाजांवर हल्लाबोल केला. दोघांनी 89 धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या.

मुंबई विजयाच्या जवळ असताना कुरनने  मुंबईला चौथा झटका दिला व कृणालला एलबीडबल्यू आऊट केलं. कृणालने 23 चेंडूत 32 धावांची खेळी केली. यादरम्यान, पोलार्डने चौकार ठोकत मोसमातील सर्वात वेगवान अर्धशतक लगावलं. पोलार्डने अवघ्या 17 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकार खेचत अर्धशतकी धावसंख्या गाठली.