राजकारणाच्या आखाड्यात परस्परांविरोधात उभे ठाकणारे राजकीय नेते क्रीडा वर्तुळात मात्र परस्परांना पुरक अशी भूमिका घेताना दिसतात. महाराष्ट्रात हे पुन्हा एकदा दिसून आले. निमित्त ठरले मुंबई क्रिकेट असोसिएशन कार्यकारिणी निवडणूक (Mumbai Cricket Association Election) 2022 चे. होय, एमसीए निवडणूक (MCA Election) मध्ये भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची एक वेगळीच युती पाहायला मिळाली. खरे तर राजकीय भूमिका परस्परांच्या विरोधात असल्या तरी राज्याच्या क्रिडा वर्तुळात त्याचे पडसाद फारसे उमटलेले दिसले नाहीत. परंतू, सध्याच्या गडूळ राजकीय वातावरणात अशे संबंध चर्चेचे आणि भूवया उंचावणारेच ठरु लागले आहेत हे खरे. त्यामुळे एमसीए निवडणुकीतील युतीकडे काहीसे आश्चर्याने पाहिले जात आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन कार्यकारिणी निवडणुकीसाठी आशीष शेलार, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, अचानक नाट्यमय घडामोडी घडल्या. शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात युती झाली. उभय नेत्यांनी तसे एक अधिकृत पत्रही जारी केले. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे गट संयुक्तरित्या निवडणुकीला सामोरे जातील. जाहीर करण्यात आलेल्या निवेदनावर दोन्ही नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तत्पूर्वी दोन्ही नेते एकमेकांना दक्षिण मुंबईत भेटले. या भेटीनंतर दोन्ही गटांनी संयुक्त निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा, National Games 2022: राष्ट्रीय खेळांमध्ये 10 वर्षीय शौर्यजीतचा जलवा; पंतप्रधान मोदींनी ट्विट करत केलं कौतुक)
एमसीए निवडणूक कार्यक्रम
एमसीए निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान 20 ऑक्टोबर रोजी होईल.
दरम्यान, माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनीही या निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या गटाकडून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता पवार शेलार गटात समेट झाल्याने पाटील आणि इतर उमेदवारांचे पुढे काय होणार याबाबत उत्सुकता आहे. पवार शेलार गटामध्ये जितेंद्र आव्हाड, मिलींद नार्वेकर यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे यांचा समावेश पवार-शेलार गटात आहे.