लखनौ सुपर जायंट्‌स‌समोर आज दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असणार असून लखनौत या दोन्ही संघाची लढत रंगणार आहे. दिल्लीसमोर कामगिरी सुधारण्याचे मोठे आव्हान आहे. लखनौचा संघ सलग चौथा विजय मिळवण्यासाठीचा प्रयत्न करताना दिसेल.  कर्णधार के. एल. राहुल व क्विंटॉन डी कॉक यांच्या सोबतच निकोलस पूरन आणि देवदत्त पडिक्कल यांच्यामुळे लखनौची फलंदाजीत मजबूती दिसून येत आहे. तर गोलंदाजीमध्ये मयंक यादव, नवीन उल हक, यश ठाकूर, कृणाल पंड्या व रवी बिश्‍नोई चांगली कामगिरी करत आहे.  ( IPL 2024 Points Table Updated: मुंबई इंडियन्सने बेंगळुरूवर 7 विकेट्सने दिली मात, जाणून घ्या पॉइंट टेबलची स्थिती)

तर दुसरीकडे दिल्लीच्या संघाला या मोसमात अद्याप सूर गवसलेला नाही. कर्णधार रिषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स या दोन खेळाडूंनी दोन अर्धशतके झळकावत आपण फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, इतर खेळाडूंची त्यांना साथ लाभत नाही. गोलंदाजांनाही प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. वेगवान गोलंदाज ॲनरिक नॉर्कियाचा सुमार फॉर्म त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरीत आहे. त्याने चार सामन्यांमधून सहा फलंदाज बाद केले आहेत. तसेच खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेशकुमार, झाय रिचर्डसन यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी झालेली नाही.

दिल्ली कॅपिटल्सला गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याआधीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने त्यांचा 106 धावांनी धुव्वा उडवला होता. त्यामुळे त्यांना खेळात मोठी सुधारणा करावी लागणार आहे. दिल्लीच्या संघाची सर्वाधिक निराशा त्यांच्या गोलंदाजांनी केली आहे. आज संध्याकाळी हा सामना 7:30 वाजता सुरु होणार असून स्टार स्पोर्टस आणि जिओ सिनेमा अॅपवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण आपण पाहु शकता.