KXIP vs RR, IPL 2020: राजस्थानने रोखला पंजाबचा विजयी रथ, किंग्स इलेव्हनविरुद्ध रॉयल्सने 7 विकेटने मिळवला दणदणीत विजय
किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Photo Credit: PTI)

KXIP vs RR, IPL 2020: किंग्स इलेव्हन पंजाबने (Kings XI Punjab) पहिले फलंदाजी करून दिलेल्या 186 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि सजू सॅमसन (Sanju Samson) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर 7 विकेटने दणदणीत विजय मिळवला. क्रिस गेलच्या (Chris Gayle) 99 धावांच्या खेळीच्या बळावर पंजाबने 185 धावांपर्यंत मजल मारली, पण ते संघाला विजय मिळवून देण्यास व्यर्थ ठरले. राजस्थानच्या विजयात स्टोक्सने 50 धावा, सॅमसनने 48 धावा आणि रॉबिन उथप्पाने 30 धावांचे योगदान दिले. कर्णधार स्टिव्ह स्मिथ नाबाद 31 आणि जोस बटलर नाबाद 21 धावा करून परतले. राजस्थानने आजच्या सामन्यात विजय मिळवत किंग्स इलेव्हनचा विजयीरथ रोखला. सलग 5 सामन्यानंतर पंजाबला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे, पंजाबच्या गोलंदाजांवर राजस्थानच्या फलंदाजांनी सुरुवातीपासून वर्चस्व कायम ठेवले. किंग्स इलेव्हनकडून मुरुगन अश्विन आणि क्रिस जॉर्डन यांनी प्रयेकी 1 गडी बाद केला. (KXIP vs RR, IPL 2020: क्रिस गेलचा नाद खुळा! टी-20 क्रिकेटमध्ये 1000 षटकार मारणारा ठरला पहिला फलंदाज, एका धावाने शतक हुकल्यावर दिली अशी प्रतिक्रिया)

स्टोक्सने त्याच्या संघाला चांगली सुरुवात केली आणि 26 चेंडूत त्वरित 50 धावांवर बाद झाला. पहिल्या विकेटसाठी स्टोक्स आणि रॉबिन उथप्पामध्ये 60 धावांची भागीदारी झाली. स्टोक्स बाद झाल्यावर उथप्पा आणि सॅमसनने डाव पुढे नेला. उथप्पाने 30 धावांची खेळी साकारली आणि मुरुगन अश्विनने त्याला बाद केले. संजू सॅमसन 48 धावा करून बाद झाला. अखेरीस कर्णधार स्मिथ आणि बटलरच्या जोडीने राजस्थानला विजयी रेषा ओलांडून दिली.

यापूर्वी, आजच्या सामन्यात पहिले फलंदाजी करत पंजाबसाठी 'युनिव्हर्स बॉस' क्रिस गेलने सर्वाधिक 99 धावांचा डाव खेळला. कर्णधार केएल राहुलने 46 धावा, तर निकोलस पूरनने 10 चेंडूत 22 धावा केल्या. रॉयल्ससाठी बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी 2 तर कार्तिक त्यागीने 1 विकेट घेतली. राजस्थानच्या विजयाने प्ले ऑफची शर्यत आणखीन रंगली आहे. पंजाब आणि राजस्थानचे प्ले ऑफमधील आव्हान अद्यापही कायम आहे. किंग्स इलेव्हन आणि रॉयल्स प्रत्येकी 12 गुणांसह पॉईंट्स टेबलवर अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.