रोहित शर्मा, किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स (Photo Credit: Twitter/mipaltan)

इंडियन प्रीमिअर लीगचा (Indian Premier League) 13वा सामना किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि मुंबई इंडियंस (Mumbai Indians) यांच्यात आज अबु धाबीमध्ये सुरु आहे. पंजाबने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईने पहिले फलंदाजी करून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 191 धावा केल्या. अशाप्रकारे किंग्स इलेव्हनपुढे विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य आहे. मुंबईकडून आजच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) अर्धशतक केले. रोहित 70 धावा करून बाद झाला. रोहितने आजच्या डावात 8 चौकार आणि 3 षटकार मारले. कीरोन पोलार्ड (Kieron Pollard) 47 आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) 30 धावा करून नाबाद परतले. कृष्णप्पा गौथमच्या अखेरच्या ओव्हरमध्ये पोलार्डचे 4 षटकार ठोकले. दुसरीकडे, पंजाबकडून शेल्डन कोटरेल, मोहम्मद शमी आणि कृष्णाप्पा गौथम यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (KXIP vs MI, IPL 2020: किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध रोहित शर्माने नोंदवला खास विक्रम; विराट कोहली, सुरेश रैनाच्या पंक्त्तीत सामील झाला मुंबई इंडियन्सचा 'हिटमॅन')

टॉस गमावून पहिले फलंदाजी करताना मुंबईला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका बसला. कोटरेलने पहिल्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर क्विंटन डी कॉक बोल्ड करून शून्यावर माघारी पाठवले. दरम्यान, कर्णधार रोहितने आयपीएल करिअरमधील 5 हजार धावा पूर्ण केल्या. डी कॉक बाद झाल्यावर आलेला सूर्यकुमार यादव देखील रोहितला अधिक काळ साथ देऊ शकला नाही आणि 10 धावांवर रनआऊट झाला. चोरटी धाव घेताना सूर्यकुमार रनआऊट झाला.  त्यानंतर रोहित आणि इशान किशनच्या जोडीने मुंबईचा डाव सावरला. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली असताना संघाची धावगती वाढवण्यासाठी फटकेबाजी करताना किशन झेलबाद झाला. त्याने 32 चेंडूत 28 धावा केल्या. अखेरीस शमीने रोहितला बाद करून मुंबईच्या धावगतीवर ब्रेक लगावला. पण, रोहित बाद झाल्यावर पोलार्ड आणि हार्दिकमध्ये अर्धशतकी भागीदारीने मुंबईला आव्हानात्मक धावसंख्येकडे नेले.

मुंबईला गेल्या सामन्यात बेंगलोरविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे पंजाबने गेल्या सामन्यात 223 धावांचा डोंगर उभारला, पण राजस्थानच्या फलंदाजांपुढे पंजाबचे गोलंदाज निरुत्तर ठरले. दोन्ही संघांना आपापल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबई आणि पंजाब विजयपथावर परतण्याच्या व दुसरा विजय मिळवण्याच्या हेतूने मैदानात उतरले आहेत.