
DC vs GT, IPL 2025 60th Match: आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या केएल राहुलने (KL Rahul) एक नवा विक्रम रचला. तो टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 800 धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. विराटने 243 डावांमध्ये ही कामगिरी केली. पण आता केएल राहुलने 224 डावांमध्ये 8000 धावा पूर्ण करून विराटचा हा विक्रम मोडला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. या सामन्यात 33 धावा करत केएल राहुलने टी-20 स्वरूपात 8000 धावांचा टप्पा गाठला. (हे देखील वाचा: Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना)
यादीत केएल राहुल पोहचला तिसऱ्या स्थानावर
एकूण आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वात जलद 8000 धावा करण्याचा विक्रम युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने केवळ 213 डावांमध्ये ही कामगिरी केली. या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे. बाबरने 218 डावांमध्ये ही कामगिरी केली. आता केएल राहुलचे नाव तिसऱ्या स्थानावर आले आहे, ज्याने 224 डावांमध्ये हा विक्रम केला. विराट कोहली (243 डाव) चौथ्या स्थानावर आहे आणि मोहम्मद रिझवान (244 डाव) पाचव्या स्थानावर आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8000 धावा करणारे फलंदाज
ख्रिस गेल – 213 डाव
बाबर आझम – 218 डाव
केएल राहुल - 224 डाव
विराट कोहली - 243 डाव
मोहम्मद रिझवान - 244 डाव
राहुलचे शानदार शतक
नाणेफेक गमावल्यानंतर, प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरुवात खूपच खराब झाली आणि फॅफ डु प्लेसिस फक्त 5 धावा करून बाद झाला. तथापि, दुसऱ्या टोकाकडून राहुलने संघाचा डाव खूप चांगल्या प्रकारे हाताळला. राहुलने अभिषेक पोरेलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. राहुलने शानदार फलंदाजी केली आणि 35 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक झळकावल्यानंतर, राहुलने आपला जबरदस्त फॉर्म धारण केला आणि चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. राहुलने 65 चेंडूत 112 धावा केल्या आणि नाबाद राहिला. त्याच्या खेळीदरम्यान, राहुलने 14 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार मारले. राहुलच्या बॅटवरून आयपीएलमध्ये हे पाचवे शतक आहे. या लीगच्या इतिहासात, राहुल सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.