KKR vs MI, IPL 2020: हिटमॅन Reloaded! रोहित शर्माची फटकेबाजी, मुंबई इंडियन्सने कोलकातासमोर 196 धावांचे विशाल आव्हान
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: Twitter/mipaltan)

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात अबू धाबीच्या (Abu Dhabi) शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा सामना खेळला जात आहे. टॉस जिंकून केकेआरने (KKR) मुंबईला फलंदाजी करण्यास बोलावले. अशा स्थितीत मुंबईने 20 ओव्हरमध्ये 195 धावा केल्या आणि केकेआरला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वाधिक 80 धावा केल्या. रोहितने 39 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि चौकार-षटकारांची बरसात केली. केकेआरकडून शिवम मावीने (Shivam Mavi) 2 आणि सुनील नारायण, आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. केकेआरने टॉस जिंकला, पण रोहित आणि मुंबईच्या अन्य फलंदाजांच्या डावासमोर तो अयोग्य ठरला. रोहित वगळता सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 47 धावांचा डाव खेळला आणि रोहितला साथ दिली. कीरोन पोलार्ड 13 धावा आणि कृणाल पांड्या 1 धाव करून नाबाद परतले. (KKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कीरोन पोलार्डला कोलकाताविरुद्ध सामन्यापूर्वी दिली खास भेट, 'हा' पराक्रम करणारा बनला पलटनचा पहिला खेळाडू)

मुंबई इंडियन्सला पहिला झटका क्विंटन डी कॉकच्या रूपात बसला जो 8 धावांवर बाद झाला. डी कॉक बाद झाल्यानंतर कर्णधार रोहितने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली आणि सूर्यकुमार यादवने त्याला चांगली साथ दिली. दोघे मोठे शॉट्स खेळत राहिले आणि 5.4 ओव्हरमध्ये अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. सूर्यकुमार अर्धशतकाच्या जवळ असताना अतिरिक्त धाव काढण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. त्याने 28 चेंडूत 46 धावा केल्या. त्यानंतर रोहितने 39 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर मैदानात आलेला सौरभ तिवारी रोहितला जास्त काळ साथ देऊ शकला नाही आणि 21 धावा करत बाद झाला. सुनील नारायणने तिवारीला माघारी धाडले.

त्यानंतर हार्दिक पांड्याने रोहितवरील ताण कमी केला आणि मोठे शॉट्स खेळले. रोहितने हार्दिकसोबत फटकेबाजी सुरु ठेवली आणि मुंबईला आव्हानात्मक धावा करण्यात मोलाची भूमिका बजावली. रोहितबाद झाल्यावर हार्दिक देखील जास्त काळ टिकू शकला नाही आणि आंद्रे रसेलने 18 धावांवर हार्दिकला बोल्ड केले. दरम्यान आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने मागील सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. विशेष म्हणजे आजचा सामना कीरोन पोलार्डचा मुंबईकडून 150 तर रोहितचा आयपीएलमधील 190 वा सामना आहे.